पारनेर :  पत्नी  नांदण्यास येत नाही तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून जावयाने सासूवर बेछूट गोळीबार करून तिला ठार मारल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजता तालुक्यातील वडझिरे येथे घडली. डोक्यात गोळी लागल्याने सविता सुनील गायकवाड वय ३८ या जागीच गतप्राण झाल्या.

यासंदर्भात पारनेर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गोरख साबळे (रा. रांधे ता. पारनेर)व अस्मिता सुनील गायकवाड यांनी दोन वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. त्या वेळी राहुल साबळे याच्या विरोधात अस्मिताचे अपहरण तसेच अ?ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस पथकाने दोघांना ताब्यात घेतल्यानंतर अस्मिता हिने आम्ही स्वखुषीने विवाह केल्याचा जबाब दिल्यानंतर राहुल व अस्मिता यांचा रांधे येथे संसार सुरू झाला. सात महिने नांदल्यानंतर अस्मिता आईकडे वडझिरे येथे आली व आपणास राहुलकडे नांदण्यास जायचे नाही असे सांगितले. पोलिसांकडे तसा जबाबही तिने दिला. त्यानंतर राहुल यास समज देण्यात येऊन हे प्रकरण मिटविण्यात आले. मात्र त्यानंतर राहुल हा अस्मिताशी संपर्क करीत असे. आपल्या पत्नीस तिची आई नांदण्यास पाठवित नसल्याची तक्रारही त्याने दिली होती. याच वादातून त्याने पोलिस ठाण्याच्या आवारात विष प्राशन के ले होते. पोलिसांनी त्यास रुग्णालयात दाखल केले, औषधोपचारानंतर त्याचे प्राण त्या वेळी वाचले होते. काही काळ तो बाहेरगावी होता नंतर  एका मित्रासोबत अस्मितासाठी मोबाईल पाठवून तो तिच्याशी चर्चा करू लागल्यानंतर राहुल याच्याविरोधात सोमवारी दुपारी तक्रार करण्यात आली होती. तक्रार करण्यात आल्याचे समजल्यानंतर संतापलेल्या राहुल याने पोलिस ठाण्यात जाण्याऐवजी वडझिरे येथे जाऊन सासू सविता सुनील गायकवाड (वय ३८) यांच्यावर बेछूट गोळीबार केला. सविता यांच्या डोक्यात, खांद्यास तसेच हातास गोळया लागल्या व त्या जागीच गतप्राण झाल्या. हल्ला केल्यानंतर राहुल तेथून दुचाकीवरून पसार झाला.मयत सविता यांचे मेहुणे संतोष कचरू उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल साबळे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.