16 October 2019

News Flash

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी

दंडाची रक्कम पीडित मुलीच्या वडिलांना देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.

प्रतिनिधिक छायाचित्र

नगर : तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन न्यायालयाने राजप्रसाद मामाप्रसाद शर्मा (३७, खंडोबा वस्ती, जामखेड) याला १० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीच्या वडिलांना देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.

जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी या खटल्याचा निकाल आज, गुरुवारी दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल सरोदे यांनी काम पाहिले.  बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) २०१२ चे कलम ५ व भादंवि ३७६ अन्वये दोषी धरुन १० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैद व भादंवि ५०६ अन्वये १ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कैद अशी शिक्षा शर्मा याला देण्यात आली.

शर्मा हा पीडित मुलीच्या घरी दि. २० जानेवारी २०१८ रोजी आला व मुलीस फिरावयास घेऊन जातो, असे सांगून सौताडा (आष्टी, बीड) येथे घेऊन आला, तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केले व कोणाला सांगितले तर मारुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर शर्मा दि. ३० जानेवारीला मुलीच्या घरी गेला, पत्नी आजारी आहे, तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे सांगून मुलीला घेऊन गेला व तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. त्यानंतर पीडित मुलीने अत्याचाराची माहिती वडिलांना सांगितली. मुलीच्या वडिलांनी  पोलिसांकडे तक्रार केली. गुन्ह्य़ाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. सहारे यांनी केला व शर्मा याला अटक करुन दोषारोपपत्र सादर केले. खटल्यात एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले.

शिक्षा सुनावताना न्यायालयाने, अशा घटना समाजावर विपरीत परिणाम करतात, अनेक घटना भीतीपोटी समाजापुढे येतही नाहीत, त्यामुळे दोषसिद्ध घटनाबाबत आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देणे आवश्यक आहे, असे नमूद केले.

First Published on April 19, 2019 3:25 am

Web Title: man sentenced to 10 years jail for sexually abusing a minor