तरुणाईची स्पंदने.. कुटुंब व्यवस्थेविषयी असणारे विविध प्रवाह.. लग्नाशिवाय आणि लग्नसंस्था यावर सूचक भाष्य आणि नकळतच आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे काही खंड, ही ‘मनाचा हरवलेला पासवर्ड’ची वैशिष्टय़े आहेत. वृन्दा भार्गवे यांच्या कसदार लेखणीतून तरुणाईची दोलायमानता, भावनिक अस्थिरता याचा जवळून प्रत्यय येतो, असे निरीक्षण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी नोंदविले आहे.
येथील शंकराचार्य न्यास संकुलातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रा. भार्गवे यांच्या ‘मनाचा हरवलेला पासवर्ड’ या दीर्घ कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि अभिवाचन कार्यक्रम सोनाली कुलकर्णी, लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, अमेय प्रकाशनचे प्रकाश लाटकर, अभिनेत्री मृणाल दुसानीस, चिन्मय उद्गीरकर यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी कुलकर्णी यांनी पुस्तकाच्या वैशिष्टय़ांसह विविध विषयांवर मत व्यक्त केले. आजच्या पिढीला सतत पुढे जात राहण्याचा ध्यास आहे. त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे. सर्व आताच्या आता आणि लगेच या एका तत्त्वावर अडून राहिल्याने ही पिढी काहीशी गोंधळली आहे. लेखिका भार्गवे यांनी कोणत्याही पिढीला चूक वा बरोबर हे दाखविण्यापेक्षा प्रत्येक व्यक्ती आपल्या जागेवर कशी योग्य आहे, हे त्रयस्थ पद्धतीने मांडले आहे. प्रत्येकाचे अभिव्यक्त होणे बदलल्याने समाज काहीसा संवेदनहीन होत आहे, अशी खंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली. गजेंद्रगडकर यांनीही दोन पिढय़ांमध्ये होत असलेल्या स्थित्यंतराच्या मुद्दय़ावर मत मांडले. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना जाणवणारी जीवनपद्धती, विचारपद्धती आणि एकूणच जगण्यातल्या बदलांविषयी संदिग्धता स्वीकारायला हवी. दोन पिढय़ांच्या जगण्याचा अचूक वेध घेत असताना तटस्थ राहण्याची क्षमता लेखिकेच्या लेखणीत आहे. दुसरीकडे, कथा हा वाङ्मय प्रकार थोडा दुर्लक्षित होत चाललेला आहे. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. या वातावरणात लेखिकेचा कथासंग्रह येणे महत्त्वाचे वाटते. हा कथासंग्रह एक विचार आणि दृष्टिकोन देतो. या कथा वेगळ्या आहेत. त्याची मांडणी आणि आशय, पात्र, आपल्या नकळत आपल्याशी संवाद साधतात. लेखनाशी एकजीव होत जीवनाकडे, आयुष्याकडे, अनुभवाकडे लेखिका कशी पाहते हे या संग्रहातून दिसते. संवेदनशीलतेला छेद देणाऱ्या कथा संयतपणे मांडण्यात आल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.
भार्गवे यांनी आपल्या पुस्तकाविषयीची भावना मांडली. आजूबाजूला दोन पद्धतीची माणसे वावरत आहेत. एक वेगवान जगण्यात सारं काही विसरलेली, तर दुसरी रस्ता चुकलेली पण घरच्यांनी सामावून घेतलेली. मग अशा वेळी नाते अधिक दृढ करायचे की नात्यातील संबंध वाढवायचे, हा प्रश्न उपस्थित होतो. या पुस्तकातून त्याच प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या एकाच कुटुंबात दोन पिढय़ा जगताहेत. नव्या पिढीला मागच्या पिढीविषयी आस्था असेलच असे नाही. मात्र मागची पिढी नव्या पिढीला सामावून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळी नवी पिढी स्वत:चे अवकाश शोधण्याचा प्रयत्न करते. या द्वंद्वावर पुस्तकातून भाष्य केले आहे, असे भार्गवे यांनी सांगितले. प्रकाशक नाटकर यांनी आजच्या पिढीच्या आभासी जगण्याकडे पुस्तकातून लक्ष वेधले असल्याचे नमूद केले. अभिनेत्री मृणाल दुसानीस व अभिनेता चिन्मय उद्गीरकर यांनी अभिवाचन केले. सूत्रसंचालन नाटय़लेखक दत्ता पाटील यांनी केले.
नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. वृन्दा भार्गवे लिखित ‘मनाचा हरवलेला पासवर्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना अभिनेत्री तथा लेखिका सोनाली कुलकर्णी, मोनिका गजेंद्रगडकर, अभिनेत्री मृणाल दुसानीस,
अभिनेता चिन्मय उद्गीरकर.