धोकादायक इमारतीतील अपुऱ्या जागेत ग्रामीण रुग्णालयाचा कारभार; रुग्णांची परवड

हेमेंद्र पाटील, लोकसत्ता

बोईसर : बोईसर शहरातील भाडेतत्त्वावरील आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली आहे. या ठिकाणी रोज शेकडो रुग्ण येतात. अपुऱ्या जागेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. याशिवाय ही इमारतही धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केल्याने रुग्णांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

तारापूर औद्य्ोगिक क्षेत्रातील हजारो कामगार हे याच बोईसर व आजूबाजूला असलेल्या भागात राहतात. त्यांना उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. मात्र, या रुग्णालयासाठी स्वतंत्र इमारत नाही. त्यामुळे सध्या भाडय़ाच्या जागेत रुग्णालय सुरू आहे. परंतु, रुग्णालय इमारत धोकादायक असल्याने आधीच गैरसोयींचा सामना करावा लागत असलेले रुग्ण भीतीच्या छायेत वावरत आहेत. इमारतीची जागा रुग्णालयासाठी पुरेशी नाही. त्यातच ती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहे. स्वतंत्र इमारत नसल्याने ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या सुविधा या ठिकाणी पुरवणे प्रशासनाला शक्य होत नाही. हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करता येत नसल्याच्या मुद्दय़ाकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी लक्ष वेधले आहे.

रुग्णालयात सध्या सेवा देत असलेल्या डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. त्यांना आवश्यक कर्मचारी संख्या कमी आहे. बाह्य़ रुग्ण विभागात तपासणीसाठी रोज अडीचशे ते ३०० रुग्ण येतात. या साऱ्या रुग्णांचा ताण रुग्णसेवेवर पडत आहे.

अडचणी अशा..

’ बोईसर ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, जागेचा तिढा कायम आहे.

’ चित्रालय भागातील बीएआरसी वसाहतीलगतच्या जागेवर रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र या जागेवर ‘बीएआरसी’कडून दावा केला जात आहे. त्यातच पालघर सत्र न्यायालयात याबाबत याचिका दाखल असल्याने जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे.

’ एकाच जागेऐवजी इतर जागांचा पर्याय उपलब्ध करून रुग्णालय उभारणीची मागणी होत आहे.

लोकप्रतिनिधींची उदासीनता

बोईसर ग्रामीण रुग्णालय इमारत धोकादायक स्थितीत असल्याने रुग्णालय इतरत्र ठिकाणी हलविणे अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. परंतु इतर ठिकाणी असलेल्या जागेबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतलेला नाही.

भूमाफियांकडून ताबा

जिल्हा प्रशासन जागेचे कारण पुढे करत असले तरी बोईसर ग्रामीण रुग्णालय असलेल्या काही अंतरावर सरावली ग्रामपंचायत हद्दीत संजय नगर येथे दोन एकर सरकारी जागा पडीक आहे. या ठिकाणी गेल्या वर्षी भूमाफियांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केला होता. ग्रामपंचायत अधिकारी यांना हाताशी धरून या ठिकाणी एक बेकायदा बांधकाम करून त्या ठिकाणी घरपट्टीही लावण्यात आली होती. ही संपूर्ण जागा महसूल विभागाने आरोग्य विभागाला तातडीने हस्तांतरित केल्यास या ठिकाणी बोईसरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम मार्गी लावता येईल.