राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याक कोटय़ामधून दिल्या जाणाऱ्या प्रवेशात पारदर्शकता असली पाहिजे आणि गुणवत्तेच्या आधारावरच हे प्रवेश दिले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. विधान परिषदेबाहेर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
विधान परिषदेत विरोधी सदस्यांनी शेतकरी प्रश्नावरून गोंधळ घालायला सुरुवात केली. या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास उरकला गेला. त्यामुळे तावडे यांनी सभागृह तहकूब झाल्यानंतर पत्रकारांना त्यांच्या कक्षात बोलावून भूमिका स्पष्ट
केली.
अभियांत्रिकी महाविद्यालयात अल्पसंख्याक कोटय़ातून होणाऱ्या प्रवेशात गैरव्यवहार आणि अनियमितता होती. त्यामुळे या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचे काम आम्ही करणार, असे ते म्हणाले. अल्पसंख्याक कोटय़ातून भरल्या जाणाऱ्या ५० टक्के जागा गुणवत्तेच्या आधारावरच भरल्या गेल्या पाहिजेत.
अल्पसंख्याक विद्यार्थी मिळाले नाहीत तर त्या जागा व्यवस्थापन कोटय़ात परावर्तित करण्यात येत होत्या. आता असे होणार नसून सर्वसामान्यांसाठी त्या जागा खुल्या करण्यात येतील. संबंधित मंत्रालयाकडून त्यासाठीची प्रक्रिया पार पाडली जाईल, असे तावडे म्हणाले.