औरंगाबादमधील मानसी देशपांडे हत्या प्रकरणातील दोषी जावेद खान याला फाशीची शिक्षा देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दिला. या प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यावरून सरकारी आणि बचाव पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. शिक्षा वाढविण्यासाठी सरकारी पक्षाने तर कमी करावी, यासाठी बचाव पक्षाने याचिका दाखल केली होती.
११ जून २००९ मध्ये १९ वर्षीय मानसी देशपांडेचा राहत्या घरी खून करण्यात आला होता. त्यानंतर दीड महिन्यांनी पोलिसांनी जावेद खान याला अटक केली होती. चोरीच्या उद्देशाने घरात घुसून जावेद खान याने मानसीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला होता. या हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. आरोपीला शिक्षा सुनावण्यासाठी पोलिसांनी ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टही केल्या होत्या. या प्रकरणात सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यावर मंगळवारी आपला निर्णय दिला. जावेद खान याने केलेला गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ ठरवत न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली.