मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोगाने मतदानासाठी एक तास अवधी वाढवून दिला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सहलीचा आनंद न लुटता मतदान करण्याची शपथ जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी मतदारांना दिली. मतदार जागृती मोहिमेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी या लोकसभा मतदार संघासाठी ८० ते ९० टक्के मतदान झालेच पाहिजे, असे आवाहन मतदारांना केले आहे. यासाठी म्हणून मिस युनिव्हर्स स्पध्रेत सहभागी झालेली मानसी मोघे हिची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.
आपण मतदानाला बाहेर पडत नाही आणि व्यवस्था बदलली नाही, सरकारने काही केले नाही, लोकप्रतिनिधी कामे करीत नाहीत, असे नेहमी म्हणतो. मी मतदान केले नाही, तर काय फरक पडणार, असा विचार करून मतदानाच्या दिवशी सहलीचा आनंद लुटतो, हे सक्षम लोकशाहीला पूरक नसून मतदानासाठी बाहेर पडा फरक पडतो, अशा प्रकारचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बल्लारपूर पेपर मिल व वेस्टर्न कोलफिल्ड येथील अधिकारी व कामगारांना केले. चंद्रपूर जिल्ह्य़ात मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी मिस युनिव्हर्स स्पध्रेत सहभागी झालेल्या चंद्रपूरच्या मानसी मोघे हिची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले.
मतदान जागृती कार्यक्रमांतर्गत बल्लारपूर पेपर मिल व वेस्टर्न कोलफिल्ड लि.मधील अधिकारी-कामगारांशी मतदानात सहभाग घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.म्हैसेकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलिल यांनी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला. यावेळी बल्लारपूर पेपर मिल युनिट प्रमुख एस.एस.अरोरा, वेकोलि महाप्रबंधक रमाकांत मिश्रा उपस्थित होते. यावेळी निवडणूक आयोगाने मतदानासाठी एक तास अवधी वाढवून दिला असून सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येईल. या मतदारसंघात १८ उमेदवार असून आपण आवडेल त्याला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. या निवडणुकीत आयोगाने यापैकी पसंत नाही अर्थात, नोटा हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र, हा शेवटचा पर्याय असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आपण स्वत: मतदान कराच, सोबतच आपले कुटुंबीय व आपल्या ओळखीच्या मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा, असे आवाहनही करून मतदानाची शपथ दिली.
मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी समाजातील प्रत्येक घटकांना प्रत्यक्ष भेटत असून ज्युबिली हायस्कुलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सुध्दा यात सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्याची विनंती करावी. आपल्यापैकी अनेक जण मतदार नाहीत, याची जाणीव असली तरी आपण इतरांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करू शकता, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मोहिमेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळा, सावित्रीबाई फुले प्राथमिक कन्या शाळा या ठिकाणी भेट देऊन मतदार जनजागृतीसंबंधी आवाहन केले.
डॉक्टर, वकील, महाविद्यालयातील विद्यार्थी, अभियांत्रिकीचे विद्यार्थी, बचत गट, विविध सामाजिक संघटना, यासह जिल्हाधिकाऱ्यांनी आनंदवन, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, बल्लारपूर, चंद्रपूर व मूल या ठिकाणी दौरे करून मतदारांना मतदानासाठी आवाहन केले व मतदान करण्याची शपथ दिली. या मतदार संघासाठी ८० ते ९० टक्के मतदान झालेच पाहिजे, असा निर्धार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.