वसंत मुंडे

आठवीत असतानाच त्याच्या  मनात अधिकारी होण्याची इच्छा निर्माण झाली. त्यातूनच त्याने घरातील अभ्यास खोलीच्या दारावर ‘विचार करा, तुम्ही एका आयएएस अधिकाऱ्याचे दार ठोठावत आहात..!’ असे लिहून आपले ध्येय निश्चित केले. बारावीनंतर शासकीय तंत्रनिकेतनमधून पदविका आणि यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. पहिल्याच प्रयत्नात अवघ्या २३ व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय गाठले. या विद्यार्थ्यांचे नाव आहे मंदार जयंत पत्की.

बीड शहरातील मंदार पत्की  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बावीसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आणि ‘महावितरण’मधील सेवानिवृत्त अभियंता जयंतराव पत्की यांचे घर अभिनंदनासाठी गर्दीने फुलले. वडील शासकीय सेवेत असल्याने  मंदारला लहानपणापासूनच प्रशासनाबाबत माहिती होती. त्यातूनच मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न त्याने शालेय जीवनात पाहिले.

संस्कार विद्यालयात आठवीत असतानाच मंदारने आपले ध्येय निश्चित केले आणि घरातील अभ्यासाच्या खोलीच्या दारावरच ‘विचार करा, तुम्ही एका आयएएस अधिकाऱ्याचे दार ठोठावत आहात..!’ असे लिहून ठेवले. आई-वडिलांनीही त्याच्या या आत्मविश्वासाला पाठबळ दिले.

दहावी-बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर मंदारने पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतनमधून अभियांत्रिकीची पदविका मिळवली.  त्यानंतर पदवीच्या शेवटच्या वर्षांत असतानाच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

ज्ञान प्रबोधिनीत अभ्यास सुरू केल्यानंतर   मंदार सकाळी साडेसहा ते रात्री साडेअकरापर्यंत अभ्यास करीत असे. या काळात त्याने कुटुंबीयांशी अत्यंत कमी वेळा संवाद साधला. मोबाइलची संगतही फारशी केली नाही. ध्येय गाठण्यासाठी पूर्ण क्षमता पणाला लावली. अनेक वेळा ध्येयापासून विचलीत करणारे प्रसंग आले तरी निश्चय ढळू दिला नाही.

मंदार स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय हे घरच्या व्यतिरिक्त मित्रांनाही फारसे माहीत नव्हते. त्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. शालेय जीवनात  खोलीच्या दारावर ध्येय लिहिणाऱ्या मंदारने अखेर तेवीसाव्या वर्षी पहिल्या प्रयत्नात यश मिळवले.  स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी मंदार आयडॉल ठरला आहे.

मुलाने कठोर परिश्रम करून मिळवलेल्या यशामुळे आपले जीवन सार्थक झाल्याचे समाधान त्याचे वडील जयंत पत्की यांनी व्यक्त केले.