अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरावर कुल कार सेवेनंतर निर्माण झालेला संघर्ष आणि त्यातून स्थापन झालेल्या मांडवा बंदर स्थानिक संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर, सचिव संतोष म्हात्रे, विक्रम-मिनीडोअर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पनवेल येथील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी परिवहन मंडळाचे अधिकारी अनंत पाटील यांनी यापुढे नव्याने मांडवा बंदरावर टुरिस्ट एजन्सीला परवानगी दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
मांडवा बंदराचा चेहरामोहरा बंदलल्यानंतर आणि तेथील जलवाहतूक सेवेमुळे पर्यटकांनी मांडवा बंदराला दिलेल्या पसंतीमुळे प्रवाशांचे लोंढे अलिबागच्या दिशेने वळू लागले. त्यामुळे येथील स्थानिक तीन आसनी व सहा आसनी रिक्षाचालकाला आíथक सुबत्ता आली. परंतु नव्याने सुरू झालेल्या कुल कार सेवेमुळे त्याला फार मोठय़ा प्रमाणात स्थानिकांचा विरोध झाला. त्यासाठी मांडवा बंदर स्थानिक संघर्ष समिती स्थापन करून मोठय़ा प्रमाणात आंदोलन छेडण्यात आले. संघटनेने आणि स्थानिक ग्रामस्थांनी आपला प्रखर विरोध दर्शविला. सुरुवातीला कुल कार सेवा थांबविण्याचे एका बठकीत मान्य झाले. परंतु शासनाने त्यांना परमिशन दिली. परिणामी येथील स्थानिक रिक्षाचालकांची घडी विस्कटली. त्यांचा व्यवसाय बुडाला.
शासनाने टुरिस्ट एजन्सीला परवाना देताना येथील स्थानिक रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात येणार नाही, अशा सूचना केल्या आहेत. परंतु नव्याने टुरिस्ट एजन्सी माध्यमातून मांडवा बंदरावर आणखी एक नवी खासगी टुरिस्ट एजन्सी सुरू होऊ पाहत आहे, त्याला येथील रिक्षाचालकांनी विरोध दर्शविला आहे. या एजन्सीमुळे ५०० स्थानिक रिक्षाचालकांची कुटुंबे धोक्यात येतील, असे मांडवा बंदर स्थानिक संघर्ष समितीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून निदर्शनास आणून दिले आहे. टुरिस्ट एजन्सीच्या ठेकेदारांनी दुचाकी गाडय़ा भाडय़ाने देण्याची व्यवस्थाही केली असून त्याचेही उद्घाटन लवकर होणार असल्याचे या निवेदनातून निर्दशनास आणून देण्यात आले आहे.
येथील सहा आसनी रिक्षाचालकांचा आणि तीन आसनी रिक्षाचालकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व खासगी टुरिस्ट एजन्सीला येथील रिक्षाचालकांचा प्रखर विरोध आहे. या पाश्र्वभूमीवर दिलीप भोईर ऊर्फ छोटम आणि विजय भाऊ पाटील यांनी कणखर भूमिका मांडली. त्यामुळे परिवहन अधिकाऱ्यांनी नव्याने येणाऱ्या टुरिस्ट एजन्सीला तसेच टू व्हीलर बाइकला परवानगी दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान, या भेटीत दिलीप भोईर आणि विजय पाटील यांनी रिक्षाचालकांच्या इतर समस्याही अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. वाढते इन्श्युरन्स, मीटर रिकॅलिब्रेशनची समस्या, स्क्रॅब गाडय़ांऐवजी नवीन गाडय़ा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या .