यंदा हवामानातील बदल, अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे आंबा व काजू पिकात पन्नास टक्के घट झाली आहे. त्यामुळे काजू बीसह काजूगरांचा दर वाढला असून आंबादेखील अद्यापि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. आंबा प्रति डझन ५०० ते ७०० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे.
हवामानातील बदल, पावसाळी वातावरणामुळे आंबा, काजू, कोकम पिकावर मोठा परिणाम जाणवत आहे. बाजारपेठेत ओला काजू विक्रीसाठी यायचा, पण याही काजूची आवक कमी झाली आहे. हा ओला काजू शेकडा दोनशे रुपये बाजारात दर आहे.
काजू पिकात पन्नास टक्के घट आली आहे. त्यामुळे काजू बी १३५ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. सुरुवातीला काजू बीचा ११० रुपयांपर्यंत दर असायचा, तो अखेरच्या काळात ९० रुपयांपर्यंत झाला. काजू आवक जास्त झाल्यावर दरात घट व्हायची, पण यंदा मात्र हाच काजू सुरुवातीला ११० रुपयांवरून १२० रुपये प्रति किलो पोहोचला आणि सध्या तो १३५ रुपये प्रति किलोवर स्थिर बनला आहे. काजू बी घट झाल्याने काजूला यंदा चांगला भाव आहे. त्या दरात घट होण्याची शक्यता नाही. मात्र प्रक्रिया करून बाजारात विक्री होणाऱ्या काजूगराचे दर मात्र वधारले आहेत. या काजूगरांच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकदेखील काजूगराच्या खरेदीत हात आखडता घेईल अशी भीती विक्रेत्यांना आहे. यंदा बदलत्या वातावरणाचा आंबा व कोकम पिकांवरदेखील परिणाम झाला आहे. आंबा बाजारपेठेत दाखल झाला पण लहान फळ ७०० रुपये प्रति डझन विक्रीला जात आहे. सध्या वेगवेगळ्या आकारातील आंबे ५०० ते ७०० रुपये प्रति डझन विक्री होत आहे. सर्वसामान्यांना हा आंबा चाखायला पावसाळ्याच्या दणक्यातच मिळणार आहे, असे सांगण्यात येते. त्यामुळे कोकणी मेवा चाखण्यासाठी पैसे मोजावे लागतील हे निश्चित बनले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 4, 2016 1:39 am