रत्नागिरी  : जागतिक पातळीवर धुमाकूळ घालत असलेल्या करोना या धोकादायक साथीच्या रोगाचा आंब्याच्या व्यापारालाही काही प्रमाणात फटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

काही प्रमुख देशांनी सुरक्षिततेसाठी परदेशी वाहतुकीवर नियंत्रणे घातली आहेत. कुवेतसह दुबईला होणाऱ्या विमानवाहतुकीवरही निर्बंध आले आहेत. कोकणातून वाशीच्या घाऊ क बाजारपेठेत  जाणाऱ्या आंब्यापैकी सुमारे चाळीस टक्के मालाची निर्यात होते. त्यातील बहुतांश माल आखाती देशांमध्ये जातो. यंदा हवाई वाहतुकीत अडथळे येण्याची भिती आहे. समुद्रमार्गे वाहतुक सुरु आहे. पण ऐन हंगामात निर्बंध राहिले तर त्याचा निर्यातीला फटका बसू शकतो. निर्यात सुरळीत चालू राहिली तर माल बाजारातून बाहेर पडतो. त्याचा साठा पडून राहत नाही. दर स्थिर ठेवण्यात निर्यातीचा वाटा अधिक असतो. त्यामुळे निर्यात थांबली तर बाजारातील दर झपाटय़ाने घसरु शकतात.

सुदैवाने सध्या वाशी बाजारात आंब्याची आवक जास्त नाही. पुढील महिन्यात ती वाढेल तेव्हा निर्यातीची काय स्थिती राहते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

याचबरोबर, आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधांमुळे यंदा निर्यातीच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे परदेशातील प्रतिनिधी येथे येऊन व्यवहार ठरण्यावर मर्यादा आली आहे.

कोकणामधून हापूस आंबा येण्याचे प्रमाण सध्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे विमानसेवा बंद असली तरीही आंबा निर्यातीवर तेवढा परिणाम झालेला नाही. समुद्रमार्गे काही प्रमाणात आंबा पाठवण्याचे प्रयत्न  सुरु आहेत. पण करोनामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या स्थितीवर आंबा निर्यातीचे भवितव्य अवंलबून राहील, असे मत वानी बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी संजय पानसरे यांनी नोंदवले.