शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे.

संभाजी भिडे यांनी नाशिकमधील एका सभेत आपल्या झाडाचा आंबा खाल्ल्याने मुलगा होत असल्याचे विधान केले होते. या प्रकरणी आरोग्य विभागाच्या आदेशानुसार महापालिकेने समिती स्थापन करुन सर्व प्रकरणाची एकतर्फी चौकशी केली होती. चौकशीअंती भिडे यांच्यावर ठपका ठेऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.

या खटल्याची सुनावणी सुरु होताच भिडे यांना हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले होते. न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध भिडे यांच्यावतीनेजिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर जिल्हा न्यायालयाने संभाजी भिडे यांना जामीन मंजूर केला असून १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.