माणिकबाई गवळी यांनी दूध आणि दही विकून जमा झालेले १ लाख रुपये पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी दान केले आहेत. या दानानंतर माणिकबाई गवळी या माऊलीचा पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने सत्कार केला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील माणिकबाई सखाराम गवळी यांनी दूध, दही, ताक विकून जमा झालेली १ लाख रुपयांची पुंजी विठ्ठलाच्या चरणी दान केली. देवाकडे काही मागायचे असेल तर दान करावे अशी भावना सर्वश्रुत आहे. मग अगदी गावचा म्हसोबा,कांदोबा ते तिरुपती बालाजी,साई बाबा पर्यंत देवाला भरभरून दान देणारे दानशूर आजही आहेत. काही श्रीमंत आपल्या कमाईतील रक्कम देवाला दान देतात. मात्र असेही काही भक्त आहेत जे आपल्या कष्टाची आणि घाम गाळून मिळवलेल धन ते संचित करून देवाला दान करतात.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील माणिकबाई सखाराम गवळी या महिला वारकऱ्याची दानशूरता दिसून आली आहे. माणिकबाई यांचा म्हशीचे दूध,दही, ताक विकण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून त्यांचा चरितार्थ चालतो. तशी आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यातून या माउलीने काही पैसे साठवले आणि नव्या वर्षाची सुरवात, साडे तीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त अशा गुढी-पाडव्याच्या दिवशी विठ्ठल –रुक्मिणी मातेच्या चरणी आपल्या पुंजीतील १ लाख रुपये दान केले. देवाला किती रुपये दान केले हे महत्वाचे नसते. मात्र, माणिकबाईनी केलेल्या दानाचा मान मंदिर समितीने केला. समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी माणिकबाई गवळी यांचा शाल,श्रीफळ,श्री विठ्ठल रुक्मिणीचा फोटो देवून सत्कार केला.