डॉ.बाबासाहेब आंबेडकर चत्यभूमिसाठी इंदू मिलची जागा देण्याबाबत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याच्या पहिल्याच कलमात वचन दिले होते. आणि त्या वचनाची पूर्ती करण्यात सगळय़ांचाच सहभाग होता. त्यामुळे इंदू मिल ची जागा देण्याबाबतचे श्रेय कुण्या एकाने लाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच कुण्या एका पक्षाने वापरलेल्या दबाव तंत्रामुळे चत्यभूमीसाठी इंदू मिलची जागा मिळाली नसून राज्यातील ११ कोटी जनतेची इच्छा आणि दबाव असल्याने ही जागा देण्याचा निर्णय झालेला आहे, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले आहे.
 रिपाईचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी इंदू मिलचे श्रेय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी घेऊ नये, असे सांगून रिपाइंने दिलेल्या आव्हान आणि इशाऱ्यांमुळेच केंद्र आणि राज्य सरकारला इंदू मिलची जागा देण्याबाबत निर्णय ६ डिसेंबरच्या आत घ्यावा लागला. असे सांगितले होते. ठाकरे म्हणाले, राज्यात आघाडी सरकार आहे. सरकारमध्ये कोणत्याही बाबतीत मतभेद नाही. विकासाचे सर्व निर्णय एकजुटीने घेतल्या जातात. मात्र प्रत्येक पक्ष आपल्या बळकटी साठी प्रयत्न करीतच असतो. निवडणूका स्वबळावर लढवाव्यात की एकत्रपणे याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.