02 July 2020

News Flash

सलग दुसऱ्या वर्षी मांजरा धरण भरल्यामुळे साखर कारखान्यांसाठी ‘अच्छे दिन’

पाणीटंचाईमुळे सर्वजण सांगेल त्या सूचना केवळ ऐकत होते त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हते.

दोन वर्षांपूर्वी पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्य़ातील एकही साखर कारखाना सुरू होऊ शकला नव्हता. मात्र गेली दोन वर्षे चांगला पाऊस झाल्याने मांजरा धरण भरले आणि त्याचा फायदा अर्थातच साखर उद्योगाला होणार आहे. चांगल्या पावसाने उसाच्या लागवडीत लक्षणीय वाढ होणार असून साखर कारखानदारीला पुन्हा एकदा अच्छे दिन येणार आहेत.

२०१५ च्या दुष्काळात पाणीटंचाईच्या समस्यासंबंधी राज्यातील विविध तज्ज्ञांनी मराठवाडय़ातील उसावर बंदी घातली पाहिजे येथपासून पाणी वाचवण्यासंबंधी विविध सूचना केल्या. पीकपालट व्हायला हवे, पिकाची पद्धत बदलायला हवी, जेथे पाऊस होत नाही तेथे उसावर बंदी घातली पाहिजे, अशा विविध सूचना तथाकथीत तज्ज्ञांनी केल्या. पाणीटंचाईमुळे सर्वजण सांगेल त्या सूचना केवळ ऐकत होते त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हते.

पाऊस नाही, धरण, विहिरी, विंधनविहिरी कोरडय़ा पडल्यानंतर आपोआपच उसाचे क्षेत्र घटले होते. त्याऐवजी सोयाबीन, तूर, हरभरा या पिकाकडे शेतकरी वळला होता. पाणी नसल्यामुळे अन्य पिकांकडे शेतकरी वळला खरा मात्र बाजारपेठेत भाव पडल्यामुळे उत्पादन अधिक होऊनही शेतकरी अडचणीत आला.

गतवर्षी लातूर जिल्हय़ात चांगला पाऊस असताना सर्वाधिक ४६ हजार हेक्टरवर उसाचे क्षेत्र होते. तोच टप्पा २०१७ च्या नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा गाठला जाईल असे चित्र आहे. सोयाबीन, तूर, हरभरा या वाणांना चांगला भाव मिळाला असता तर कदाचित उसाऐवजी हीच पिके घ्यावीत असे शेतकऱ्यांनी ठरवले असते. मात्र भाव पडल्यामुळे हमखास भाव मिळणारे पीक म्हणून  शेतकरी पुन्हा एकदा उसाकडे वळला आहे. नॅचरल शुगरचे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांना उसाच्या क्षेत्रात वाढ कशी होत आहे यासंबंधी विचारले असता ते म्हणाले, ऊस घेण्याच्या पद्धतीत बदल केला पाहिजे. शंभर टक्के ठिबकवर उसाची लागवड झाली पाहिजे मात्र साप सोडून जमीन थोपटण्याचे प्रयोग करत उसालाच नावे ठेवली जातात हे चुकीचे आहे. उसाला पाणी जास्त लागत नाही. ते चुकीच्या पद्धतीने दिले जाते म्हणून पाण्याचा अपव्यय होतो. शेतकरी आता ठिबकडे वळतो आहे. २०१५-१६ मध्ये आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील २५० गावांमध्ये केवळ ९५० हेक्टर उसाचे क्षेत्र होते. ते वाढवून आता १५ हजार हेक्टरवर झाल्याचे ते म्हणाले. उसाला चांगले पसे मिळत असल्यामुळे शेतकरी उसाकडे वळत असल्याचेही ठोंबरे म्हणाले.

मांजरा साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी आपल्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र भरपूर वाढल्याचे मान्य केले. या वर्षी साखर कारखान्याने गाळपाचे सहा ते साडेसहा लाख टनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आम्ही शेतकऱ्यांना उसाचे क्षेत्र वाढवण्यापेक्षा उसाचे एकरी उत्पादन वाढवले पाहिजे त्यातून अधिक पसे कसे मिळतील याकडे लक्ष केंद्रीत करत आहोत. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. सरकारने आता ठिबक सिंचनाचा वापर वाढवावा यासाठी प्रयत्न सुरू केला असला तरी मांजरा परिवार सरकारच्या एक पाऊल पुढे आहे व आम्ही पूवींपासूनच ठिबकचे क्षेत्र वाढवण्यासाठी कारखान्याच्यावतीने प्रयत्न करत आहोत. त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देत आहोत. शेतकरी श्रीमंत होण्यापेक्षा तो सुखी झाला पाहिजे यावर भर असल्याचे ते म्हणाले.

सिद्धीशुगरचे चेअरमन बाबासाहेब पाटील यांनी, मांजरा धरण भरले असले तरी िलबोटी धरणात ८० टक्के व तिरू प्रकल्पात ५० टक्केच पाणीसाठा आहे. या वर्षी कारखान्याने चार ते पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे व ते पूर्ण होईल. पुढील वर्षी काही प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढणार असल्याचे ते म्हणाले.

विकास सहकारी साखर कारखान्याने मराठवाडय़ातील साखर कारखानदारीत या वर्षी एक नवा प्रयोग करायचे ठरवले आहे. नव्याने जे उसाचे क्षेत्र वाढते आहे त्यापकी १५०० एकर क्षेत्रावर सेंद्रीय उसाची लागवड करायची. शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक माहिती व खते कारखान्याच्यावतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही लागवड पूर्ण होईल व पुढच्या वर्षीच्या हंगामात सेंद्रीय उसाचे स्वतंत्र गाळप करून १०० टक्के सेंद्रीय साखर विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल. शेतकऱ्याला यासाठी अधिक भाव दिला जाईल. विकास कारखान्याने आपली वेगळी वाट कारखानदारीत रुळवली आहे. शेतकऱ्याचे एकरी उत्पादन वाढावे, शेतकऱ्याला अधिक नफा मिळावा यासाठी कारखान्याच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.

सेंद्रीय उसाचा एक वेगळा प्रयोग कारखान्याच्या क्षेत्रात केला जातो आहे. सेंद्रीय शेतीत उत्पादन दुपटीने वाढण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. उसाबरोबरच शेतकऱ्यांनी अन्य पिके सेंद्रीय पद्धतीने घेतली तर त्याला वाढीव उत्पन्न मिळेल. शेतकऱ्याच्या राहणीमानाचा दर्जा वाढावा यासाठीच साखर कारखाना प्रयत्नशील असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अमित देशमुख यांनी सांगितले.

सलग दोन वष्रे पाऊस चांगला झाल्यामुळे उसाच्या क्षेत्रात वेगाने वाढ होते आहे. त्यामुळे साखर कारखाने मोडीत काढावे लागतील असे केले गेलेले भाकीत चुकीचे ठरून पुन्हा कारखान्यांना चांगले दिवस येतील असे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे. मराठवाडय़ात लातूर जिल्हय़ात साखर कारखानदारांनी आपला नावलौकीक कमावला होता. पुन्हा कारखान्यांना गतवैभव प्राप्त होण्याची संधी वरुणराजाने उपलब्ध करून दिली आहे. गतवर्षीही चांगला पाऊस झाल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढण्यासाठी मदत झाली होती. अशाचप्रकारे फायदा यंदा ऊस शेतीला होईल.

उसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज

गतवर्षी पाऊस चांगला झाला. मांजरा धरण काठोकाठ भरले त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र वाढवले. २०१५ मध्ये पाऊस नसल्यामुळे उसाचे क्षेत्र जिल्हय़ात केवळ आठ ते नऊ हजार हेक्टर शिल्लक राहिले होते. २०१६ च्या हंगामात त्यात वाढ होऊन ते ३६ हजार हेक्टरवर पोहोचले. यावर्षी पुन्हा एकदा धरण भरलेले आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र आणखीन किमान १० हजार हेक्टर्स वाढेल, असा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2017 3:56 am

Web Title: manjara dam full sugar factory
Next Stories
1 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मेजर रमेश उपाध्याय यांना जामीन मंजूर
2 शिर्डी विमानतळाचे १ ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
3 रायगडमध्ये राणे यांच्या पक्षांतराचा परिणाम नाही!
Just Now!
X