पाणीटंचाईची चिंता घटली

जिल्ह्यत दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणीटंचाईची चिंता बऱ्याचअंशी मिटली आहे. जिल्ह्यतील विविध प्रकल्पात एकूण १७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मांजरा व तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी आले आहे. अद्याप जिल्ह्यतील ६७ टक्के प्रकल्प कोरडेठाक आहेत. झालेल्या पावसाचा रब्बी हंगामासाठी काही प्रमाणात फायदा झाला असला तरी खरीप हंगामातील  हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान झाले आहे.

यंदाच्या पावसाळ्याचे चार महिने उलटून गेले तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यत भीषण दुष्काळ ओढवण्याची  परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सप्टेंबरअखेर व ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने दोन टप्प्यात हजेरी लावल्याने प्रकल्पात १७ टक्के पाणीसाठा झाला आहे. दोन दिवसांत झालेल्या परतीच्या पावसामुळे उस्मानाबाद, कळंब, वाशी, भूम, परंडा तालुक्यातील अनेक भागांतील काहीप्रमाणात पाणीटंचाई कमी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यतील लहान-मोठय़ा २२३ प्रकल्पांपकी सध्या ६७ प्रकल्प कोरडेठाक आहेत. दोन दिवसांच्या पावसामुळे मांजरा, तेर धरणाच्या मृत साठय़ात तर इतर लहान-मोठय़ा प्रकल्पात काहीप्रमाणात पाणीसाठा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यतील ७३ लहान-मोठय़ा मध्यम लघु प्रकल्पात जोत्याच्या जवळ पाणीसाठा झाला आहे. ८३ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. पाणीसाठय़ाचे हे प्रमाण अत्यंत कमी असल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे. आता पावसाळ्याचे दिवस संपले असून परतीच्या पावसाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आणखी दमदार पाऊस झाल्यास रब्बी हंगाम शेतकऱ्यांना घेता येणार आहे. दोन टप्प्यात झालेला परतीचा पाऊस काही ठराविक मंडळात झाला आहे. यामुळे काही मंडळातच रब्बीची पेरणी होऊ शकते. ज्या मंडळात परतीचा पाऊस कमी झाला आहे, त्या मंडळातील शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी आगामी काळात दमदार पावसाची गरज आहे.

जिल्ह्यतील २० लघु प्रकल्पांत पाणीसाठा

जिल्ह्यत परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा प्रकल्पातील मृतसाठय़ात काही प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यतील २० लघु प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. ७३ प्रकल्पातील पाणी जोत्याजवळ आले आहे. मात्र, १२ लघु प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. आठ लघुप्रकल्पात ७५ टक्के तर १० लघु प्रकल्पात १६ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, जिल्ह्यतील इतर प्रकल्प कोरडेठाक आहेत. प्रकल्पात साठलेले पाणी जमिनीत मुरून पाणीपातळी वाढणे गरजेचे आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने विहिरी, विधन विहिरींचे पाणी वाढून त्याचा लाभ होणार आहे.