मनमाड बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने ४२ लाखांचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. गैरव्यवहाराची रक्कम १३ टक्के व्याजासह तत्कालीन संचालक मंडळ, समितीचे सचिव व लेखापाल यांच्याकडून वसूल करण्याची शिफारस चौकशी अधिकारी उपनिबंधक जी. जी. बलसाने यांनी शासनाला दिलेल्या अहवालात केली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जो गैरव्यवहार झाला त्यात आमचा सहभाग नसून त्यावेळी आम्ही विरोधात होतो. गैरव्यवहारास आम्ही वेळोवेळी विरोध केला असतानाही आमच्याकडून ही रक्कम वसूल करण्याची चौकशी अधिकाऱ्यांनी केलेली शिफारस अन्यायकारक असल्याचे माजी सभापती अंकुश कातकाडे यांनी सांगितले. तर माजी सभापती प्रकाश घुगे यांनीही चौकशीवर आक्षेप घेऊन गैरव्यवहार झाल्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगत या चौकशी अहवालाला कायदेशीर उत्तर देऊ असे नमूद केले.

मनमाड बाजार समितीत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी माजी आमदार संजय पवार, जगन्नाथ धात्रक, अ‍ॅड. अनिल आहेर या माजी आमदारांसह बाजार समितीचे माजी संचालक गंगाधर बिडकर, इतर काही शेतकरी, मतदारांनी केल्या होत्या. विविध तक्रारी आल्यानंतर पणन संचालकांनी त्यांची दखल घेत मालेगावचे उपनिबंधक जी. जी. बलसाने यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. बलसाने यांनी केलेल्या चौकशीत ४२ लाख २९ हजार ८९५ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. संबंधित रक्कम ही तत्कालीन संचालक मंडळ, बाजार समितीचे सचिव व लेखापाल यांच्याकडून वसूल करण्याची शिफारस शासनाला पाठविलेल्या अहवालात केली आहे.