नारायण राणे यांनी आत्मचरित्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले असतानाच या दाव्यांवर शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”२५ वर्षे एका पक्षात काम केले, त्याने आपल्या सहकाऱ्यांवर आणि नेत्यांवर टीका करणे योग्य नाही. ज्यांच्यामुळे आपण मोठे होतो, त्यांच्याविरुद्ध बोलायचे यातून त्यांची पातळी दिसते”, अशा शब्दात मनोहर जोशी यांनी राणेंवर पलटवार केला आहे.

नारायण राणेंना पक्षात ठेवलं तर रश्मीसह घर सोडेन अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना दिली होती असा दावा आपल्या आत्मचरित्रात खासदार नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणेंच्या आत्मचरित्राचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येत्या काही दिवसात होणार असून राणेंनी शिवसेना का सोडली याचे कारणही आत्मचरित्रातून उलगडणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोहर जोशी यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे.

बाळासाहेब ठाकरे हे एक आश्चर्यच होते. मी सुरुवातीपासून त्यांच्यासोबत होतो. कोणत्याही सभेला जाताना ते मला घेऊन जायचे. यामुळे फायदा होतो, तसा तोटाही असतो. यातून काही शत्रूही निर्माण झाले, असे जोशींनी सांगितले. बाळासाहेबांनी नारायण राणेंना फोन केला होता आणि उद्धव ठाकरेंनी दिलेली धमकी, यात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.  शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, शिक्षण म्हणजे त्याचे विचार काय असतात, तो काय म्हणतोय हे महत्त्वाचे असते, असेही जोशी यांनी म्हटले आहे. राणे यांना उद्देशून त्यांनी हे विधान केले आहे.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांची भेट झाली होती का, असा सवाल मनोहर जोशी यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले,  राणे यांच्याशी संपर्क झाला नाही आणि भेटही झाली नाही.