काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री सरकारची तिजोरी खाली करून आपल्या सात पिढय़ांचा उद्धार करीत असतात. त्यांच्या समर्थकांनाही तीच सवय लागली असल्याने हे भ्रष्ट शासन बदलून भाजपाच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी यांचे सरकार निवडून द्यावे, असे आवाहन गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी केले. संजय मंडलिक व राजू शेट्टी यांना मतदान म्हणजे नरेंद्र मोदी यांना मतदान ठरेल असेही ते म्हणाले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथील संत नामदेव भवन येथे जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
पर्रीकर यांनी गोव्यातील विकासकामे आणि नागरी हिताच्या योजना कशाप्रकारे साकारल्या याचा आढावा घेतला. विविध क्षेत्रातील वंचितांपर्यंत कल्याणकारी योजना पोहचविणे कसे शक्य आहे याचा दाखला देत भाजपाचे शासन म्हणजे सुशासन असल्याचे त्यांनी नमूद केले. संपूर्ण देशात सुशासनाची हमी देणारे सरकार येण्यासाठी आणि भ्रष्ट शासनाचे निर्मूलन होण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. परिवर्तन घडवण्यामध्ये महिलांचाही मोठा वाटा असतो. त्यामुळं प्रत्यक्ष निवडणुकीतही महिलांनी मोठय़ा संख्येने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केलं.
खासदार राजू शेट्टी यांनी वाडय़ावरचे राजकारण बांधावर, शिवारात आणण्याची किमया केल्यानं सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी असल्याचे सांगितले. शेट्टींनी सहकार मोडला अशी गरळ ओकणा-या प्रवृत्तीचा पंचनामा उद्याच्या प्रचार सांगता सभेत इचलकरंजीवासीयांसमोर करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. आमदार सुरेश हाळवणकर यांनी सर्वसामान्य जनता शेट्टी यांच्या पाठीशी उभी असल्याने साखर सम्राटांच्या विरोधातील लढाई ते निश्चितपणे जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. सभेत दत्तवाड ग्रामस्थांनी निवडणूक निधी म्हणून खासदार शेट्टी यांना १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.