रोहिणी रडारचा फायदा सर्जिकल स्ट्राइकला झाला, सर्जिकल स्ट्राइकचा प्लॅन यशस्वी जवानांनीच केला. त्यामुळे भारतीयांसोबतच जवानांचे मनोबल वाढविणारा सर्जिकल स्ट्राइक ठरला, असे उद्गार माजी संरक्षणमंत्री, गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांचा आशावाद वाढवितानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला सन्मान मिळवून दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षांनिमित्त सब का साथ सब का विकास द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदीसह केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या कार्यशाळेत मुख्यमंत्री पर्रिकर बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, अतुल काळसेकर, संदेश पारकर, काका कुडाळकर यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. सर्जिकल स्ट्राइकचे प्लॅनिंग माझे असले तरी प्लॅन जवानांनी यशस्वी केला. त्या रात्री मला झोपच आली नाही असे सांगताना मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले, भारतीयांनी जवानांप्रति कृतज्ञ राहावे. जवानांच्या यशाबद्दल किंवा कामगिरीबद्दल उलटसुलट बोलणाऱ्यांविरोधात जनतेने उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांचे मनोबल वाढविले. देश-विदेशात भारताचा सन्मान वाढविला. त्यांनी विकेंद्रीकरणातून पारंपरिक कौशल्य विकास साधण्याला महत्त्व दिले. देश खऱ्या अर्थाने बदलतोय असे चित्र भारतीयांच्या मनात निर्माण करण्याचे धाडसी कार्य पंतप्रधानांनी करून ‘‘सब का साथ, सब का विकास’’ला महत्त्व प्राप्त करून दिल्याचे मुख्यमंत्री पर्रिकर म्हणाले. राजकारण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे तो बदलला. त्यांनी सर्व आघाडय़ांवर विकास संकल्पनांना प्राधान्य दिल्याने पुढील १५ ते २० वर्षे मोदी यांना पाठिंबा दिल्यास देशात सोन्याचा धूर निघेल, असा विश्वास मुख्यमंत्री पर्रिकर यांनी व्यक्त करून देशाबद्दल वाईट बोलणाऱ्याला देशात राहण्याचा अधिकार नसल्याचा इशारा दिला. देश एकसंध असावा ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका आहे. भाजपने केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवाव्यात, असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. जिल्ह्य़ाच्या विकासात शिवसेना-भाजपने एकत्र येऊन काम करू या तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवून चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू या, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन मेघना हिरंडे, काका कुडाळकर यांनी केले. सर्जिकल स्ट्राइक यशस्वी प्लॅनबद्दल पर्रिकर यांचा सत्कार करण्यात आला.