आज वटपौर्णिमा आहे. पतीला दीर्घायुष्य मिळावे तसेच पुढचे सात जन्म हाच पती मिळावा यासाठी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला फेऱ्या मारुन धागा बांधतात. खरंतर या पूजेच्या निमित्ताने स्त्रिया नवऱ्याप्रती स्नेह आणि प्रेम भावना व्यक्त करतात. पण या समाजात असे ही काही पुरुष आहेत ज्यांना सात जन्म सोडाच पण पुढच्या सात सेकंदासाठी सुद्धा बायको नकोय.

अशाच काही पत्नीपीडित पुरुषांनी एकत्र येऊन औरंगाबादमध्ये पिंपळ मुंज पौर्णिमा साजरी केली. या पुरुषांनी वडाऐवजी पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारुन पुढच्या जन्मी ही पत्नी नको तसेच पत्नीच्या त्रासातून मुक्तता व्हावी यासाठी यमराजाला प्रार्थना केली. औरंगाबादमध्ये एक पत्नीपीडित नावाची संघटना असून पत्नीच्या त्रासाला कंटाळलेले काही पुरुष या संघटनेचे सदस्य आहेत.

या पुरुषांनी पिंपळाच्या झाडाची पूजा करताना फेऱ्या मारुन सफेद धागा गुंडाळला. या झाडावर त्यांनी वेगवेगळे फलकही लावले होते. यमराज आम्हाला बायकोच्या त्रासातून मुक्त कर, यमराज सात जन्म आम्हाला ही बायको नको असे संदेश या फलकावर लिहिले होते. या पिंपळ मुंज पौर्णिमेमध्ये सहभागी झालेल्या एका पुरुषाने प्रतिक्रिया देताना सांगितले कि, पत्नीने मला भरपूर त्रास दिलाय. आज मी जगत असलो तरी फक्त पुतळा म्हणून असे त्याने सांगितले. आपल्या परिस्थितीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी वट पौर्णिेमेच्या एकदिवस आधी झालेल्या या अनोख्या पिंपळ मुंज पौर्णिमेची बरीच चर्चा सुरु आहे.