लॉकडाउन आणि उकाड्यानं त्रस्त झालेल्या सगळ्यांच्याच नजरा वरुणराजाच्या आगमनाकडे लागलेल्या होत्या. मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची वर्दी हवामान विभागानं दिली होती. अखेर प्रतीक्षा संपली असून, मान्सूननं महाराष्ट्रात पाऊल ठेवलं आहे. पुणे वेधशाळेनं ही माहिती दिली असून, पुढील पाच दिवसात (१५ जूनपर्यंत) राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे.

मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रावर ढगांची गर्दी होऊ लागली असून, मान्सननं आस्ते कदम महाराष्ट्रात पाऊल ठेवलं आहे. पुणे वेधशाळेनं ही माहिती दिली आहे. याविषयी बोलताना पुणे वेधशाळेचे अनुपम कश्यपी म्हणाले,”मान्सूनचं आगमन झालं आहे. गोवा, दक्षिण कोकण, दक्षिण मराठवाडा या भागातून मान्सून पुढे सरकत आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाऊस होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील पाच दिवसात राज्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. १२, १३, १४ जून या दिवसात चांगला पाऊस होईल, अशी माहिती कश्यपी यांनी सांगितलं.

“कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. ६.५ सेंटीमीटर ते ११.५ सेंटीमीटर इतका पाऊस होऊ शकतो. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. १३ जून रोजी मुंबईतही अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन ते तीन दिवसात कोकण व मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मराठवाड्यात आज व उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. विदर्भात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात आजपासून (११ जून) पावसाला सुरूवात होईल. त्यानंतर उद्यापासून (१२ जून) पावसाचा जोर वाढेल. त्याचबरोबर १४ जून रोजी पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे,” असं अनपम कश्यप यांनी सांगितलं.