अंबानी स्फोटकं प्रकरणात आढळून आलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन याचा यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. या मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मृत्यू प्रकरणावरून ठाकरे सरकारला धारेवर धरले. त्याचबरोबर हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा दाखल देत सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केल्याचं म्हटलं. त्यामुळे सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, अशी मागणीही भाजपानं लावून धरली. त्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. वाझे यांना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. “हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या दाव्यानुसार एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केला असून, या प्रकरणी वाझे यांना अटक करा,” अशी मागणी फडणवीस यांनी केली. यावेळी फडणवीस यांनी त्यांची तक्रारही वाचून दाखवली.

आणखी वाचा- मनसुख हिरेन यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकला; फडणवीसांचा गंभीर आरोप

त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं. देशमुख म्हणाले, “२५ फेब्रुवारी रोजी जी घटना घडली आहे. मनसुख हिरेन यांची घटना दुर्दैवी आहे. स्कॉर्पिओ गाडी सापडली. हिरेन यांची हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू आहे. स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मयताच्या पत्नीने जी तक्रार दिलेली आहे. ती सगळीकडे प्रसिद्ध झाली आहे. एटीएस याचा तपास करेल. विरोधी पक्षाकडे जास्तीचे पुरावे असतील, तर त्यांनी तपास यंत्रणांना द्यावेत. एटीएस निष्पक्षपणे याचा तपास करेल, अशी ग्वाही मी देतो,” असं देशमुख म्हणाले.

आणखी वाचा- दाऊद, शिवसेना ते अँटिलिया! नक्की कोण आहेत सचिन वाझे?

त्यावर फडणवीस यांनी पुन्हा गृहमंत्र्यांना धारेवर धरलं. “सचिन वाझे हा एका पक्षाशी संबंधित असल्यामुळे गृहमंत्री त्याला पाठिशी घालत आहेत. केवळ सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे म्हणून अपराध्याला पाठिशी घालणे योग्य नव्हे. सचिन वाझे यांना आत्ताच्या आत्ता निलंबित करा आणि अटक करा,” मागणी फडणवीस यांनी केली. “उपलब्ध पुरावे हे सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना बडतर्फ करून त्यांचा तात्काळ अटक करा,” असा पुनर्रुच्चार फडणवीस यांनी केला. त्यांच्या मागणीनंतर भाजपाच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी संताप व्यक्त करत “मुळात देवेंद्र फडणवीस यांना कॉल डिटेल्स रेकॉर्ड कसे मिळाले? त्यांना ते मिळवण्याचा अधिकार आहे का?,” असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा- मनसुख हिरेन कोण होते?, ती कार त्यांच्याकडे कशी आली?

नाना पटोलेंच्या प्रश्नानंतर फडणवीस आक्रमक झाल्याचे दिसले. “सरकारने माझी चौकशी करावीच. मी सीडीआर मिळवला. माझी चौकशी करा, पण खून केला त्याला पाठिशी का घालता? तुम्ही मला चौकशी लावण्याची धमकी देत आहात का?, सभागृहात बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. तुम्ही माझी चौकशी लावा. मात्र, याप्रकरणात तुम्ही शोधणार नाही, त्यापलीकडची माहिती मी मिळवून दाखवतो,” असं आव्हानही फडणवीस यांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mansukh hiren death case sachin vaze devendra fadnavis anil deshmukh maharashtra assembly bmh
First published on: 09-03-2021 at 14:59 IST