News Flash

अनेकजण ‘गॅस’वर, शेवटपर्यंत अनिश्चितता!

काँग्रेस व भाजपने अधिकृत उमेदवारी घोषित करण्याबाबत सर्वानाच ‘गॅस’वर ठेवले. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही अस्वस्थता कायम आहे.

| September 27, 2014 01:53 am

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनिश्चितता, कार्यकर्त्यांचा संभ्रम व काही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांबाबत ताणलेली उत्सुकता या पाश्र्वभूमीवर निवडणुकीतील गोंधळ चांगलाच वाढला. काँग्रेस व भाजपने अधिकृत उमेदवारी घोषित करण्याबाबत सर्वानाच ‘गॅस’वर ठेवले. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही अस्वस्थता कायम आहे.
युती तुटली, आघाडीही फुटली. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीने जिंतूरला विजय भांबळे, परभणीतून महापौर प्रताप देशमुख, गंगाखेडला डॉ. मधुसूदन केंद्रे यांची उमेदवारी निश्चित केली. पाथरीतून सुरेश वरपुडकर अपक्ष म्हणून मदानात उतरले आहेत. वरपुडकरांनी राष्ट्रवादी कार्यालयात मुलाखत दिली होती. वरपुडकरांना शह देण्यासाठी मदानात उतरण्याची आमदार बाबाजानी यांचीच इच्छा आहे. तसे झाल्यास उद्या (शनिवारी) त्यांचा अर्ज राष्ट्रवादीकडून दाखल होऊ शकतो.
सेनेने पाथरीत मीरा रेंगे, गंगाखेडला डॉ. शिवाजी दळणर, जिंतूरला राम पाटील, तर परभणीत डॉ. राहुल पाटील यांची उमेदवारी घोषित केली. परभणीत डॉ. पाटील यांची उमेदवारी जवळपास अंतिम मानली जाते. रेंगे, राम पाटील यांचे अर्ज दाखल झाले, तर उद्या डॉ. दळणर यांचा अर्ज दाखल होईल. सर्वाधिक अनिश्चितता आहे ती काँग्रेस व भाजपमध्ये. जिंतूरचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. बोर्डीकरांचे नाव काँग्रेसच्या पहिल्या यादीत होते. जिंतूर वगळता अन्यत्र काँग्रेस उमेदवारांबद्दल शेवटच्या क्षणापर्यंत संदिग्धताच राहिली. परभणीत इरफानूर रहेमान खान यांना उमेदवारी निश्चित झाल्याबाबत वृत्त गुरुवारीच दाखल झाले. तथापि पक्षाने अधिकृत घोषणा केली नाही. काँग्रेस उमेदवारीचे प्रबळ दावेदार आनंद भरोसे यांनी शुक्रवारी अपक्ष अर्ज दाखल केला. पाथरीत काँग्रेसचा उमेदवार कोण, हा तिढा कायम होता. माजी मंत्री वरपुडकर काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा दिवसभर होती. तथापि वरपुडकर यांनी अपक्ष अर्ज जाहीर केला.
भाजपतर्फे चारही मतदारसंघांत कोण उमेदवार, याची शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकताच आहे. माजी आमदार विजय गव्हाणे यांच्या उमेदवारीचा संभ्रम कायम होता. गंगाखेडला पक्षातर्फे रत्नाकर गुट्टे, गणेश रोकडे, विठ्ठल रबदडे आदी दावेदार असले, तरीही पक्षाने कोणालाच ‘बी फार्म’ दिला नव्हता. प्रचारास अवघ्या १५ दिवसांचा अवधी हातात असल्याने सर्वच उमेदवारांना रात्र थोडी सोंगे फार या स्थितीला सामोरे जावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 1:53 am

Web Title: many candidate on gas
Next Stories
1 पत्नीच्या खुनाबद्दल पतीला जन्मठेप
2 साखर कामगारांचे आता लेखणी, कोयता, चिमणी बंद आंदोलन – बी. आर. पाटील
3 कोल्हापुरात विनय कोरे, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, कदम यांचे अर्ज दाखल
Just Now!
X