राज्यातील आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. तशी परिस्थिती आलीच तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवण्यासाठी पुढे येतील, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात कोणताही राजकीय भूकंप होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अदृश्य हात असल्याचा गौप्यस्फोट करून शिवसेनेला एकप्रकारे ‘अदृश्य’ इशाराच दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील युती सरकारमधील भाजप-शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून विस्तव जात नाही. दोन्ही पक्ष एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. अनेक मुद्द्यांवरून एकमेकांवर टीका करण्याची संधी त्यांचे नेते सोडत नाहीत. या पार्श्वभूमीवर ‘एबीपी माझा’वरील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज्यात कोणताही राजकीय भूकंप होणार नाही, असं त्यांनी सांगितलं. राज्यातील भाजपचं सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य हात पुढे येतील, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. पण हा अदृश्य हात ‘पंजा’ नाही, अशी कोपरखळीही त्यांनी काँग्रेसला मारली.

शिवसेना आणि भाजपमधील कुरबुरींबाबतही त्यांनी आपली मतं मांडली. शिवसेना आणि भाजप हे दोन वेगळे पक्ष आहेत. दोन वेगळे पक्ष आहेत तिथे थोडा विरोध होतो. कुरबुरी या होणारच. पाच वर्षे आम्ही गुण्यागोविंदानं नादू. सरकार चालवू. एकमेकांवर टीका, कुरघोडी करत शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगलं काम करत राहू, असंही ते म्हणाले. नकारात्मक विचार करायचाच कशाला असा प्रश्न उपस्थित करून सकारात्मक विचार करू, असंही ते म्हणाले. सरकारला कोणताही धोका नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर भाजपला सत्तेत राहण्यासाठी शिवसेनेच्या टेकूची गरज नाही या चर्चेलाही त्यांनी उत्तर दिलं. खरं तर महाराष्ट्रातून मिळालेल्या मतांच्या गणिताबाबत मी विचारच केला नाही. माध्यमांतूनच हे सर्व कळलं, असं सांगून त्यांनी आम्ही शिवसेनेसोबत आहोत हेच वास्तव असल्याचंही ते म्हणाले.