30 September 2020

News Flash

यवतमाळ विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी मोर्चेबांधणी

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेवर सध्या शिवसेनेचा ताबा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भाजप नेत्यांच्या भेटी, शिवसेनेचीही मनधरणी

नितीन पखाले, यवतमाळ

येथील स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधान परिषद सदस्य तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्याने यवतमाळच्या रिक्त जागेसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली. काही इच्छुकांनी स्थानिक भाजप, शिवसेना नेत्यांना सोबत घेऊन नागपूर, मुंबईच्या फेऱ्याही केल्याचे सांगितले जात आहे.

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेवर सध्या शिवसेनेचा ताबा आहे. यापूर्वी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने बाहेरून पाठवलेले उमेदवार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप बाजोरिया यांचा पराभव करून ही जागा मिळवली होती. सावंत यांच्यामुळे यवतमाळात शिवसेनेची ताकद वाढली होती. येथून विजयी झाल्यानंतर आ. तानाजी सावंत हे या मतदारसंघात फारसे फिरकले नसले तरी आमदार निधी आणि सामाजिक कामांसाठी आर्थिक योगदान देऊन ते स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कायम संपर्कात राहिले. दोन महिन्यांपूर्वी सावंत यांची राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली. ऑक्टोबर २०२२ पर्यंत आमदारकीचा कालावधी असताना सावंत यांनी भूम-परांडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यांचा दणदणीत विजयसुद्धा झाला.

तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडून गेल्याने स्थानिक शिवसेना नेतृत्वाच्या राजकीय प्रगतीतील अडथळा दूर झाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेतील एका गोटात व्यक्त होत आहे. २०१६ मध्ये सांवत यांच्या विजयासाठी शिवसेनेचे संजय राठोड यांच्यासह भाजपचे मदन येरावार यांनी संयुक्तपणे परिश्रम घेतले होते. त्यामुळे येथील रिक्त जागेवर पुढील तीन वर्षांसाठी या दोन नेत्यांच्या मर्जीतलाच उमदेवार पुन्हा विराजमान होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. काही कंत्राटदारांसह उद्योगपतींनी या जागेवर वर्णी लागावी म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सावंत यांनी विधानसभेकरिता उमदेवारी अर्ज दाखल करताच यवतमाळच्या जागेसंदर्भात शिवसेना, भाजपच्या स्थानिक नेत्यांसह नागपूर आणि मुंबई येथे वरिष्ठ नेत्यांची बैठक झाल्याची माहिती आहे. ही जागा कोणत्याही स्थितीत एका माजी आमदाराच्या निकटवर्तीयास मिळवून द्यायची, यासाठी शिवसेना आणि भाजपकडूनही प्रयत्न होत आहे. यावर शिवसेना आणि भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे विधान परिषदेच्या जागेसाठी निर्माण झालेली चुरस बघता स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये संभाव्य घोडेबाजारावरून आतापासूनच समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 4:33 am

Web Title: many leaders lobbying for yavatmal legislative council seat zws 70
Next Stories
1 अमरावती जिल्ह्याच्या राजकारणाचा लंबक सत्तेकडे
2 मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जोरगेवारांनी भाजपला पाठिंबा देण्याचे संकेत दिले
3 महावितरणमध्ये मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये डावलले!
Just Now!
X