News Flash

वर्धा : लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल; प्रशासनाचा शेतकऱ्यांना दिलासा

शेतकरी नेत्यांकडून झाली होती मागणी

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेतला. (संग्रहित छायाचित्र।इंडियन एक्स्प्रेस)

कठोर निर्बंधांमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याची ओरड झाल्यानंतर आजपासून ग्रामीण भागातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. खासदार, आमदारांसह शेतकरी नेत्यांनी कडक निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली होती. ‘लोकसत्ता’नेही खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

नव्या नियमांनुसार जिल्ह्यात बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पोस्ट ऑफिस, अत्यावश्यक सेवेतील दुकाने, राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. शेतकऱ्यांना बांधावर खत व बियाणे पोहचविण्यास सुद्धा सुरुवात झाली असल्याची माहिती कृषी अधीक्षक डॉ. विद्या मानकर यांनी दिली. सामाजिक बांधिलकी म्हणून कृषी कर्मचारी, अधिकारी हे काम तत्परतेनं करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. नव्या निर्देशानुसार शेतकऱ्यांचा शेतीचा हंगाम सुरू होणार असल्यामुळे शेतीशी निगडित कामे शेतकऱ्यांना करता येणार आहे. तसेच त्यांच्याकडील शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी ७ ते ११ या वेळेत आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतमाल नेण्यापूर्वी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा तसेच याबाबत नियंत्रण करण्याची जबाबदारी जिल्हा उप निबंधक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील कृषिशी संबंधित दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, दुकानदारांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार निविष्ठा किंवा शेतीशी निगडित अवजारे पोहोचवावी. तसेच शेतकऱ्यांच्या अवजारांची दृरुस्ती करून द्यावी. कृषी केंद्र चालकांना विविध कंपन्यांमार्फत खते, बियाण्यांचा पुरवठा करण्याकरिता निविष्ठा गोदमामध्ये उतरविण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंधन पुरवठा संबंधित पेट्रोल पंपधारकांनी उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देश दिले गेले आहेत.

शेतकऱ्यांना सुद्धा ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांना अडचण आल्यास याची जबाबदारी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेतीची कामे करता येणार आहेत. ग्रामीण भागातील पेट्रोल पंप सकाळी ७ ते १ पर्यंत चालू राहतील तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंप दिवसभर सुरू राहतील. कोविडच्या मार्गदर्शक नियमानुसार गर्दी टाळण्यासाठी सामान्य ग्राहकांसाठी/ बचत खाताधारकांसाठी बँकिंग/ग्राहक सेवा या सकाळी १० ते दुपारी २ वाजेदरम्यान सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुपारी २:३० ते ४ वाजेपर्यंतची वेळ ही फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणारे उदा. पेट्रोल पंप, मेडिकल, दवाखाने, किराणा दुकाने, कृषी सेवा केंद्र, गॅस एजन्सी इ. करिता म्हणजेच करंट खाताधारकांसाठी आणि पीक कर्जासंबंधी कामकाजाकरिता राखून ठेवण्यात आली आहे. निराधार पेंशन योजना, पीएम-किसान सन्मान योजना इ. सर्व प्रकारच्या सामाजिक सहायता योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुदान तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतील अनुदान वितरण हे बँक मित्रांद्वारे गावांमध्ये सुरू केले आहे. पोस्टाद्वारे गावातच अनुदानाचे वितरण केले जाणार आहे.

बँक खाताधारक १० रुपयांपर्यंतची रक्कम “आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS)” सुविधेद्वारे गावातील “पोस्ट ऑफिसमधून इंडियन पोस्ट पेमेंट बँक”च्या माध्यमातून काढता येणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात १५६ तसेच तालुका स्तरावर २७ पोस्ट कार्यालये कार्यरत आहेत. याद्वारे बँक खाताधारकांना “निराधार पेंशन योजना, पीएम-किसान सन्मान योजना इ.” प्रकारच्या सर्व शासकीय योजनांचे अनुदान पोस्ट ऑफिसमधूनही काढता येणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त बँक खातेधारकांनी आपल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा बँक मित्र यांच्या माध्यमातून संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 3:01 pm

Web Title: many services allowed by administration lockdown rules change in wardha maharashtra bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “अनिल परब यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”, किरीट सोमय्यांनी केला गंभीर आरोप!
2 मोदी सरकार ४०० हून अधिक जागा जिंकण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर राऊतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
3 ‘त्या’ पत्रावरून रोहित पवारांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर, म्हणाले…
Just Now!
X