महिनाभर विजेशिवाय; दहा दिवसांनी वीजपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा

हर्षद कशाळकर

निसर्ग चक्रीवादळाने खंडित झालेला रायगड जिल्ह्य़ातील वीजपुरवठा २९ दिवसांनंतरही सुरळीत होऊ शकलेला नाही. त्यामुळे श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि माणगाव तालुक्यांतील अनेक गावे अजूनही अंधारात आहेत. या गावांमधील वीजपुरवठा सुरू होण्यासाठी आणखीन आठ-दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्य़ातील किनारपट्टीवरील भागात धडकले. वादळानंतर जिल्ह्य़ातील आठ तालुक्यांमधील वीजपुरवठा खंडित झाला. यात प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा, माणगाव, पेण तालुक्यांचा समावेश होता. यातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि माणगाव तालुक्यांतील काही गावांचा वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकलेला नाही.

वादळात मोठे नुकसान

या वादळात महावितरणची ३२ उपकेंद्रे बंद पडली होती. ६ हजार ७७३ रोहित्रांमध्ये बिघाड झाला होता. उच्च दाबाचे ५ हजार ५०७ खांब तर लघू दाबाचे ११ हजार ८९ खांब जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्यात मोठय़ा अडचणी निर्माण झाल्या होत्या. या कामासाठी प्रचंड मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यामुळे राज्यातील विविध भागांतून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पथकांना रायगड जिल्ह्य़ात पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही वीजपुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही.

वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विजेअभावी पाणीपुरवठय़ावरही परिणाम होत आहे.

दूध, भाजीपाला खरेदीसाठी जादा रक्कम मोजावी लागत आहे. मोबाइल फोन चार्जिगसाठी पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामांना गती देण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

दोनशे गावांना विजेची प्रतीक्षा

वादळामुळे ६ लाख ३८ हजार ८५९ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. यातील ५ लाख २८ हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा २८ जून २० पर्यंत सुरळीत करण्यात आला आहे. १ हजार ९७६ गावांपैकी १ हजार ७२९ गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. उर्वरित २०० गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कामे सुरू आहेत, अशी माहिती महावितरणच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

१२ जुलैपर्यंत सर्व गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी अजून काही दिवस संयम राखावा.

– निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच वादळग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि माणगाव तालुक्यांतील वीजपुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाही. तांत्रिक अडचणीमुळे या कामात उशीर होत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगीतले. पण १५ जुलैपर्यंत उर्वरित सर्व गावांचा वीजपुरवठा सुरळीत होईल अशी ग्वाही त्यांनी आम्हाला दिली आहे. महावितरणने कामाची गती वाढवायला हवी.

-विनोद घोसाळकर, अध्यक्ष, म्हाडा

वादळ येऊन आता २९ दिवस झाले आहेत अजूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. विजेअभावी लोकांचे हाल सुरू आहेत. महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला गती द्यायला हवी.

-अभय पाटील, नागरिक, बोर्ली