मालेवाडा शस्त्रसाठा, नक्षलवादी साहित्य जप्त

नक्षलविरोधी अभियान राबविणारी पोलिस पथके व रस्त्याने ये-जा करणाऱ्या पोलिसांची वाहने स्फोटात उडविण्यासाठी खामतळा-मरमा रस्त्यावरील नाल्यावर पेरून ठेवलेला शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त करून नक्षलवाद्यांचा डाव उधळला.

गोपनीय माहितीच्या आधारे उपविभाग कुरखेडा अंतर्गत पोलिस मदत केंद्र मालेवाडा हद्दीतील खामतळा-मरमा रस्त्यावर मरमा गावाजवळील नाल्यावर नक्षलवाद्यांनी मोठा शस्त्रसाठा पेरून ठेवला होता. या जप्त केलेल्या शस्त्रसाठय़ात ४ किलोचे भूसुरुंग जागेवरच निकामी करण्यात आले. नक्षलविरोधी अभियान राबविणारे पोलिस पथकाचा घातपात व रस्त्याने ये-जा करणारी पोलिस वाहने उडविण्यासाठी जमिनीत भुसूरूंग पेरला होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे हा भूसुरुंग निष्क्रीय करण्यात आला. जप्त केलेल्या साहित्यात २ लोखंडी क्लेमोर माइन्स, ५ किलो पिवळी पावडर, १ देशीकट्टा, १ वायर बंडल, रेडिओ, ४ जिलेटीनसदृश्य कांडय़ा, टॉर्च, बॅटरी, २ किलो स्कोटकसदृष्य कांडय़ा इत्यादी साहित्याचा समावेश आहे.

कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी मालेवाडा व येथील पोलिस महानिरीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, क्युआरटी आणि बॉम्बशोधक व नाशक पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा भूसुरुंग निकामी करून नक्षली साहित्य जप्त केले आणि नक्षलवाद्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला. नक्षलवाद्यांविरुध्द पुराडा पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तसेच या भागात नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.