अमडापूर ते उंद्री मार्गावरील मराठा हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरला उशीर झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक व ग्राहकांमध्ये वादावादीनंतर हाणामारी झाल्याची घटना १७ जुलैच्या रात्री घडली.
या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच प्रकरण चिघळून त्याचे रूपांतर उंद्री येथे आज दोन गटातील हाणामारीत झाले.
यावेळी झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील ९ जण जखमी झाले असून परस्पर दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १६ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
उंद्री मार्गावरील हॉटेल मराठाचे मालक कृष्णा गजानन बनकर (२४,रा. डासाळा) यांच्या तक्रारीवरून १७ जुलैला अमडापूर पोलिसांनी संतोष ओवळकर, गणेश हजारे, गोटय़ा ओवळकर व राजू हजारे यांच्याविरुद्ध हॉटेल मालकास मारहाण व तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या हॉटेलात जेवण आणण्यास उशीर का झाला, या क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीचा वाद उभय गटात खदखदत असल्यामुळे काल, २३ जुलैला उंद्री येथील बुलढाणा मार्गावर उफाळून आला. यात दोन्ही गट आमने-सामने येऊन त्यांच्यात लोखंडी सळई, रॉड, सराटे आदीने हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील महिला व पुरुषांसह ९ जण जखमी झाले.
या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरुध्द तक्रारीवरून अमडापूर पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदविण्यात आलेल्या आहेत. पुढील तपास अमडापूर पोलिस करीत आहेत.