11 December 2017

News Flash

Maratha Kranti Morcha LIVE: देता की जाता…मोर्चेकऱ्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी मोर्चाला पाठिंबा

मुंबई | Updated: August 9, 2017 3:08 PM

सकाळी अकरा वाजता भायखळातील जिजामाता उद्यानातून मोर्चाला सुरुवात झाली.

‘एक मराठा, लाख मराठा’…मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आरक्षण देता की जाता…असा आवाज आज मुंबईत घुमला. राज्यभरात ५७ मोर्चे काढले आहेत. मुंबईतील हा अखेरचा मोर्चा असणार आहे. त्यामुळं आता आरक्षण देता की जाता, असा निर्वाणीचा इशाराच मराठा क्रांती मूक मोर्चातून सरकारला देण्यात आला. मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन दिलं. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा निर्धार शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या प्रमुख मागणीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी आज मुंबईत सकाळी मराठा समाजाच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला.  भायखळा येथून मोर्चाला सुरूवात झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी साडे बाराच्या सुमारास मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झालं. यावेळी व्यासपीठावर तरुणी आणि मुलींची भाषणे सुरू झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, असं त्यांनी भाषणातून सांगितलं.

दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी  समाजाच्या वतीनं शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलं.  या शिष्टमंडळात मराठा समाजातील सहा मुलींचा समावेश होता. त्यांनी विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं. सरकारकडून ठोस उत्तर मिळाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा निर्धार शिष्टमंडळात सहभागी झालेल्या मुलींनी व्यक्त केला.

 

LIVE UPDATES:

०३.०५: शिष्टमंडळाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन दिले

०२:१८: शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देणार

०२:१७: मराठा समाजातील तरुणींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विधानभवनात

०१:३६: आरक्षण नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही प्रवेश मिळत नाही: तरुणींनी मांडली व्यथा

०१: ३४: मराठा समाजाला आरक्षण देता की जाता, तरुणींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

०१:२८: मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा समाजातील तरुणींची मागणी

०१:१६: आझाद मैदानात मोर्चात सहभागी झालेल्या तरुणी निवेदन वाचून दाखवत आहेत.

१२:३४: मराठा मोर्चा आझाद मैदानात दाखल.

१२:२७: मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री महत्त्वपूर्ण घोषणा करणार: दानवे (टीव्ही वृत्त)

१२: १५: मराठा समाजाला सरकारने न्याय द्यावा – नितेश राणे

१२:१४: मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे – निलेश राणे

१२:०८: मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ पोहोचला.

१२:०४: काँग्रेस नेते निलेश राणे मोर्चात सहभागी.

 

 

११:३०: शिस्तबद्धपणे मोर्चेकरी आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ

११:२४: मोर्चात सहभागी झालेल्या बांधवांच्या स्वागतासाठी राजकीय पक्षांनी लावलेले फलक मोर्चेकरांनी हटवले.

११:०७: भाजप नेते आशीष शेलार यांनी आझाद मैदानात येण्याचा प्रयत्न केला, आम्ही त्यांना विरोध दर्शवला, पण धक्काबुक्की झाली नाही: आयोजक

११:०१: भायखळा येथील जिजामाता उद्यानातून मोर्चाला सुरुवात. मोर्चात लाखो बांधव सहभागी.

१०:४०: मरीन ड्राईव्ह ते गिरगाव चौपाटीदरम्यान वाहतूक कोंडी.

०९:१९: मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईत आज टोलमाफ

०८:३०: पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, ठाण्यात आनंदनगर टोल नाक्यापासून वाहतूक कोंडी

०७:४९: मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त

०७: ४५: लोकल ट्रेनमधून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना.

०७:४०: राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील बांधव मुंबईत पोहोचले.

First Published on August 9, 2017 7:38 am

Web Title: maratha kranti morcha 2017 in mumbai live updates jijamata udyan to azad maidan wednesday maharashtra