16 February 2019

News Flash

मराठा तरुणांवरील कायद्याने आणलेले विघ्न थांबवा: उद्धव ठाकरे

आंदोलकांवर झालेले गुन्हे अद्याप मागे घेण्यात आलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी समाजाला दिलेला शब्द पाळावा आणि आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र पेटवणारा शिवरायांचा मावळा नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा आणि मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना मराठा समाजासोबत असून मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने राज्यात ठोक मोर्चे निघाले. मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये समाजकंटक घुसले आणि त्यांनीच तोडफोड केली. मात्र, गुन्हे निरपराध तरुणांवर दाखल करण्यात आले. शिवरायांचे मावळे कधीच महाराष्ट्र पेटवणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा आणि मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. गणेशोत्सवात मराठा आंदोलकांवरील कायद्याचे विघ्न थांबवा, कायद्याचा चुकीचा वरवंटा त्यांच्या घरावर फिरतोय, असेही त्यांनी सांगितले. वातावरण बिघडायच्या आत, परिस्थिती वाईट व्हायच्या आधी मराठा समाजाला न्याय द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. पोलिसांकडे काही पुरावे असतील तर जरूर अटक करा, असेही त्यांनी नमूद केले.

मराठा समाजासह अन्य समाजानेही न्यायासाठी सरकारकडे पाठपुरावा केला आहे. या सर्व समाजांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन कधी भरवणार, असा सवाल त्यांनी भाजपाला विचारला. कोपर्डी बलात्कार प्रकरण हे जलदगती न्यायालयात अडकले आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी याप्रसंगी केली.

First Published on September 11, 2018 2:40 pm

Web Title: maratha kranti morcha coordinator meets shiv sena party chief uddhav thackeray