साताऱ्यातील दंगल, सांगलीतील प्रवाशांसह बस जाळण्याचा निषेध

मराठा समाजास आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी लागलेल्या हिंसक वळणाबाबत आता समाजातूनच चिंतेचा सूर उमटू लागला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, नरसय्या आडम मास्तर, सामाजिक चळवळींमधील ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर, मेधा पानसरे, विजयसिंह मोहिते-पाटील, मालोजीराजे छत्रपती, सतेज पाटील आदींनी या हिंसक आंदोलनाचा निषेध केला असून, मराठा समाजाने आपल्या मागण्या शांततेनेच मांडण्याचा आग्रह धरला आहे. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी देखील या आंदोलनात समाजविघातक प्रवृत्तींचा शिरकाव झाल्याचे मान्य करत त्यामुळे हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे सांगितले.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सध्या राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. साताऱ्यातील आंदोलनावेळी हमरस्त्यावरील दुकाने, वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडल्या. सांगलीत गुरुवारी प्रवाशांसह एसटी बस पेटवण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. सातारा, सांगलीसह राज्यभरातील या घटनांचा निषेध करत अनेकांनी या आंदोलनाबद्दल चिंतेचा सूर व्यक्त केला आहे.

काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कुठल्याही मागणीसाठी हिंसेचा हा मार्गच चुकीचा असल्याचे सांगत सातारा आणि सांगलीतील घटनेचा निषेध केला आहे. या अशा हिंसेतून मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, तसेच अशा वेळी राज्यकर्त्यांनी देखील बोलताना विचार करून बोलावे असे खडे बोल सुनावले आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून द्यावा आणि शासनाने तातडीने त्यांच्याशी संवाद सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांसह बस जाळणे, तोडफोड, दगडफेकीचे प्रकार चुकीचेच असल्याचे ते म्हणाले. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी हे आंदोलन अधिक जबाबदारीने पुढे नेताना समाजविघातक शक्तीवर बारीक नजर ठेवणेदेखील गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. माकपचे नरसय्या आडम मास्तर यांनी आंदोलनात हिंसेचे प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता आंदोलनाच्या नेतृत्वाने घेणे हे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांनी या हिंसाचाराचा निषेध करत शांततामय आंदोलनाला वेगळे वळण लागले कसे? हे शोधून काढण्याची मागणी केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनात काही अपप्रवृत्ती घुसल्यामुळेच त्यात चुकीच्या गोष्टी घडल्या असाव्यात अशी शंका व्यक्त केली आहे. सांगलीतील प्रवाशांसह निघालेल्या एसटी बसला आग लावणे आणि साताऱ्यात निरपराध लोकांची वाहने, दुकाने यांची तोडफोड, पेटवण्याच्या घटना अत्यंत चुकीच्या आणि निषेधार्ह असल्याचे डॉ. पाटणकर म्हणाले.

सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पानसरे यांनीही मागण्यांचा पाठपुरावा करताना आंदोलकांनी घेतलेला हा हिंसेचा मार्ग चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले. लोकशाहीत सनदशीर मार्गाने लढा चालवला पाहिजे असे त्या म्हणाल्या. मालोजीराजे छत्रपती यांनी हिंसक घटनांचा निषेध करताना समाजाच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. आमदार सतेज पाटील यांनीही समाजाच्या मागण्यांसाठी वाहनांची जाळपोळ, मोडतोड अशा घटना अयोग्य असल्याचे सांगितले.

आयोजकांचे आवाहन

मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त असली तरी कायदा हातात घेऊन मागण्या रेटण्याचा प्रकार चुकीचाच आहे. अशी कृत्ये न करता तरुणांनी संयम बाळगून लोकशाही मार्गाने आंदोलन करणेच योग्य असल्याचे मत मराठा क्रांती मोर्चाचे सांगली जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. शिराळा तालुक्यात काल एसटी बस जाळण्याचा प्रकार निषेधार्हच असून, यामुळे सामान्य माणसांची होरपळ होणार आहे. एसटी अथवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून प्रश्न सुटत नसतात, तर अधिकच चिघळण्याचा धोका यात असतो. मराठा क्रांती मोर्चाचे सोलापूर जिल्हा प्रमुख, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनीही हिंसेचा मार्ग सोडून देत आंदोलनात समाजविघातक शक्ती शिरकाव करत नाहीत ना याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सकल मराठा समाजाचे माउली पवार यांनीही आपल्या आंदोलनाचा समाजातील अन्य लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.