खासदार उदयनराजे भोसले यांनी कोणत्याही पक्षातून निवडणूक लढवल्यास आमचा त्यांना पाठिंबा असणार आहे. त्यांच्या प्रचारासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरणार आहोत, असे मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी पुण्यात स्पष्ट केले.

मंगळवारी पुण्यात मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उदयनराजे यांच्या उमेदवारी वरून राज्यात चर्चा सुरू आहे. या विषयी विचारलेल्या प्रश्नांवर पाटील यांनी उदयनराजेंना आमचा पाठींबा कायम असल्याचे सांगितले. आजपर्यंत राज्यातील सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे सांगून प्रत्येक वेळी फसवणूक केली. त्यामुळे आम्ही राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीत पाडव्याच्या दिवशी रायरेश्वर येथे नव्या पक्षाच्या घोषणा केली जाईल. तसेच या पक्षात नव्या चेहऱ्याना संधी दिली जाणार असून प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभा करणार आहोत. राज्यातील सताधारी पक्षाला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षाला सोबत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासह अनेक प्रश्न गंभीर झाले आहेत. त्याला वाचा फोडण्यासाठी ‘एक मराठा ..लाख मराठा’ अशा घोषणा देत लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. मराठा समाजाच्या भावनांना हात घालणारा हा विषय तापत चालला आहे. मराठा समाजाचे प्रश्न धसास लावण्यासाठी अशा राजकीय पक्षाची गरज असल्याचे सांगण्यात आले. गेली दोन दशके हे प्रश्न प्रलंबित आहेत. ते कोणत्याच राजकीय पक्षांनी ते सोडवले नाहीत. त्यामुळे राजकीय पक्ष स्थापन करून त्याचा पाठपुरावा करून ते तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.