धवल कुलकर्णी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणाऱ्या पुस्तकांचा वाद सुरू असताना मुंबईमध्ये होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल एक नवी मागणी झाली आहे. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी अशी मागणी केली आहे की, हे स्मारक अरबी समुद्रात न बांधता जमिनीवर व्हावं. खेडेकर म्हणाले की, हे स्मारक सध्याच्या राजभवनाच्या जागेवर, महालक्ष्मी येथील विस्तीर्ण अशा रेसकोर्सवर किंवा रे रॉड, डॉकयार्डच्या आसपास असणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्ट किंवा राज्य शासनाच्या जमिनीवर व्हावं.

“शिवाजी महाराजांच्या स्मारकाची कल्पना तशी जवळपास ५० वर्षे जुनी आहे. पण मराठा सेवा संघाची स्थापना १९९० च्या आसपास झाल्यानंतर या चर्चेला गती मिळाली. आम्ही सर्वांनी ही मागणी रेटून धरली. १९९५ ला मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्याच वर्षी आम्ही याबाबत त्यांच्यासोबत पहिली मिटिंग घेतली. त्यांनी मुंबईतल्या गोराईमधली जागा या स्मारकासाठी सुचवली होती. पण, काही कारणांनी ही जमीन उपलब्ध होऊ न शकल्याने साधारणपणे २० ते २५ एकर जमिनीवर गोरेगावला हे स्मारक व्हावं, असा विचार पुढे आला होता. एवढ्या छोट्या जमिनीवर हे स्मारक बांधणं दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मान्य नव्हतं,” अशी माहिती खेडेकर यांनी दिली.

खेडेकर पुढे म्हणाले, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधावं अशी कल्पना पुढे आली. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि पीडब्ल्यूडीमध्ये नोकरीला होतो. त्यामुळे मी हे सांगू शकतो की समुद्रात उभ्या राहणाऱ्या स्मारकाची देखभाल दुरुस्ती, सुरक्षा, मेंटेनन्स जिकिरीचं आहे. परत समुद्रात जर स्मारक उभं केलं तर ते अत्यंत मर्यादित जागेवर येईल.

न्यूयॉर्कमधील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’सुद्धा वर्षातून तीन ते चार महिने पूर्णपणे बंद ठेवायला लागतं. कारण पाण्यात असल्यामुळे त्याला गंज लागतो. एखाद्या समुद्रातल्या स्मारकाला भेट द्यायची असेल तर ते भरती ओहोटी अवलंबून असतं. अर्थात तिथे जाणे खर्चिकही ठरतं.

स्मारकात फक्त शिवाजी महाराजांच्या लढाईचे प्रसंग न दाखवता ते लोककल्याणकारी राजे कसे होते, त्यांची आज्ञापत्र हीसुद्धा दाखवावीत आणि इथे हे पुराभिलेख, ग्रंथालय वगैरे सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावे. हे स्मारक समुद्रात केलं त्याच्यासाठी कदाचित जागा मिळणार नाही.

“आमची मागणी आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे जगाला आणि आपल्याला सुद्धा योद्धा म्हणून परिचित आहेत पण या स्मारकाच्या माध्यमातून त्यांची लोककल्याणकारी राजाची प्रतिमा जोपासली गेली पाहिजे. त्यांचा पुतळा हा सिंहासनावर बसलेला आणि मेघडंबरीतला असावा,” असे खेडेकर म्हणाले. अरबी समुद्राच्या जवळपास जर हे स्मारक बांधायचे असेल तर त्याच्यासाठी तीन जागांचा त्यांनी पर्याय सुचवला. हा पर्याय म्हणजे राज भवनाचा. सध्याचे राजभवन हे मंत्रालयासमोर असलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यांच्या जागी हलवावे, असा पर्याय त्यांनी सुचवला.

दुसरे दोन पर्याय म्हणजे महालक्ष्मी रेस कोर्स आणि मुंबई पोर्टच्या जागा जसे की रे रोड, डॉकयार्ड वगैरे. स्मारक जमिनीवर उभारल्यास अर्ध्या किमतीत होईल आणि शहरातून तथा बाहेरून येणाऱ्या लोकांना तिथे दिवसभर आणि तेही कमी खर्चात पोचता येईल. संशोधकसुद्धा तिथे दिवसभर बसू शकतील. याबाबत आम्ही लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देऊन अशी मागणी करणार आहोत, असे खेडेकर म्हणाले. शिवाजी महाराजांचे स्मारक किती उंच आहे याबाबत इतर स्मारकांची स्पर्धा लावायला नको, असे खेडेकरांनी आग्रहाने मांडले.