मराठा आरक्षण आणि इतर अनेक प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रात मराठा समाजाने मूक मोर्चे काढले. लाखोंच्या संख्येने येणारे मराठा बांधव आणि त्यांचे शिस्तबद्ध मोर्चे हा सगळ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय होता. मात्र हे मोर्चे काढूनही कोणतीही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळेच आता यापुढे मोर्चे नाही तर गनिमी काव्याने सरकारविरोधात लढा देऊ अशी गर्जनाच मराठा महासभेने केली.

औरंगाबाद शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात मराठा महासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आता मोर्चे बस झाले गनिमी काव्यानेच लढा द्यायचा असा निर्धार करण्यात करण्यात आला. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित तरूणीला न्याय मिळालाच पाहिजे आणि मराठा आरक्षणासह इतर मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत. अशा मागण्या मोर्चाच्या वेळी करण्यात आल्या. मराठ्यांचा मूक हुंकार सगळ्या महाराष्ट्राने अनुभवला मात्र सरकारने आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही. त्याचमुळे यापुढे ‘गनिमी कावा’ हीच लढ्याची पद्धत असल्याचे जाहीर करण्यात आले.

सरकारने दिलेल्या आश्वासन पूर्तीसाठी आणखी दोन महिन्यांचा अवधी मराठा महासभेने दिला आहे. मराठा समजाने घेतलेल्या महासभेला मराठवाडा आणि इतर विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या मागण्या मान्य होणार नसतील तर मतदानावर बहिष्कार, सरकारसोबत असहकार आणि आक्रमक होणे ही त्रिसूत्री वापरा असा संदेश यावेळी देण्यात आला. ही त्रिसूत्री वापरली तरच मागण्या मान्य होतील असेही मत काहींनी मांडले.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महासभेची सुरूवात झाली. भारतीय संविधानाने समता, बंधुता आणि न्याय या गोष्टी सांगितल्या. मराठा समाजाला न्याय कधी मिळणार? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून सरकारकडून फक्त आश्वासनेच दिली जात आहेत. मागण्या तशाच प्रलंबित आहेत, त्यासाठीच रविवारी औरंगाबादमध्ये महासभा बोलावण्यात आली होती.

मुंबईत ९ ऑगस्ट २०१७ रोजी मराठ्यांचा शेवटचा मूक मोर्चा निघाला होता. त्याहीवेळी मराठा आरक्षणाची मागणी एकमुखाने करण्यात आली. या आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरात अनेक मोर्चे काढण्यात आले मात्र आश्वासन पूर्तता झाली नसल्याने आता गनिमी काव्याची घोषणा करण्यात आली आहे.