राज्यात आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्चे शांततेत निघत असले, तरी राज्य सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर पुढील काळातील मोर्चे शांततेत पार पडतील, याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही. मराठा समाजाचा उद्रेक होऊ शकतो, हा सरकारला दिलेला इशाराच आहे, असे मराठा समाज क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी म्हटले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांची बैठक सोमवारी औरंगाबादमध्ये झाली. त्यानंतर वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना मोर्चाचे समन्वयक रविंद्र काळे यांनी हा इशारा दिला.
मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासह इतर काही मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येते आहे. या मोर्चांना समाजातील बांधवांचा, महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. वेगवेगळ्या शहरांत झालेल्या मोर्चांना लाखो नागरिकांनी उपस्थिती लावली आहे. आतापर्यंत पुणे, नवी मुंबई, नगर, बीड, नाशिक यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढण्यात आलेले आहेत. येत्या काळात सांगली, सातारा, बारामती, कोल्हापूर, मुंबई या ठिकाणी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सांगलीमध्ये २७ सप्टेंबरला तर सातारामध्ये ३ ऑक्टोबरला, कोल्हापूरला १५ ऑक्टोबरला मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चांच्या नियोजनासाठी औरंगाबादमध्ये झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीनंतर माहिती देताना राज्य सरकारला थेट इशारा देण्यात आला. मराठा क्रांती मोर्चे आतापर्यंत विविध भागांत शांततेत पार पडले आहेत. पण पुढील काळातही हे मोर्चे शांततेतच पार पडतील, असे सांगता येणार नाही. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे. तसे झाले नाही तर मराठा समाजाचा उद्रेक होऊ शकतो. आम्ही हा सरकारला इशाराच देत आहोत, असे आयोजकांनी म्हटले आहे.