मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चाकण येथे सोमवारी (३० जुलै) झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्या सुमारे ४ ते ५ हजार जणांवर सामूहिक गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलकांनी येथे वाहनांची तोडफोड करीत जाळपोळही केली होती. यामध्ये ३० बस जाळण्यात आल्या होत्या. सार्वजनिक मालमत्तेचे इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पोलिसांकडून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगल घडवणे, जमाव जमवणे, पोलिसांवर हल्ला करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा यात समावेश आहे.

चाकणच्या मुख्य चौकात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरुवातीला शांततेत सुरू होते. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवले त्यानतंर अचानक एकाने पुणे-नाशिक महामार्गावर उभ्या असलेल्या बसच्या दिशेने दगड भिरकवला आणि त्यानंतर मोर्चाला हिंसक वळण लागले. त्यानंतर आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

दरम्यान, पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या जाळपोळीत ३० बसेस, ट्रक, पोलिसांची खाजगी आणि सरकारी वाहने जाळण्यात आली आहेत. तर सर्वसामान्य जनतेच्या वाहनांना देखील यावेळी लक्ष करण्यात आले. यात शंभरच्या जवळपास वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे चाकण परिसरात सोमवारी अत्यंत तणावाचे वातावरण होते.