News Flash

मराठा आंदोलन सैरभैर

जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी तोडफोड झाली तसेच आंदोलकांनी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला.

‘बंद’ला हिंसक वळण

पुणे, औरंगाबादमध्ये हिंसक वळण; द्रुतगती महामार्ग सहा तास ठप्प

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर राज्यात गुरुवारी झालेल्या ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलनाला पुणे आणि औरंगाबादमध्ये हिंसक वळण लागले. गेल्या वेळेसारखा हिंसाचार होऊ दिला जाणार नाही आणि आंदोलन शांततेच पार पडेल, अशी ग्वाही आयोजकांनी दिली असतानाही अशा घटना घडणे हे आंदोलन आणि आंदोलक सैरभैर झाल्याचे लक्षण आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आंदोलनामुळे सहा तास ठप्प झाला होता. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला मात्र ‘बंद’मधून वगळण्यात आले होते.

या ‘बंद’ला गुरुवारी पुणे शहरात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी तोडफोड झाली तसेच आंदोलकांनी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टायर जाळण्यात आले. मुंबई-बेंगळुरु बाह्य़वळण मार्गावर चांदणी चौकात दुपारी तीनच्या सुमारास रास्ता-रोकोचा प्रयत्न झाला. त्यानंतर चांदणी चौकात आंदोलकांनी पोलिसांवरही थेट दगडफेक सुरू केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी प्रथम सौम्य लाठीमार केला.अश्रुधुराची नळकांडी फोडल्यानंतर आंदोलक पांगले. या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले.

औरंगाबादमध्ये प्रथम शांततेत सुरू असणाऱ्या बंदला शहराजवळील वाळुज औद्योगिक वसाहतीत हिंसक वळण लागले. औद्योगिक वसाहतीतील १२ ते १३ कंपन्यांमध्ये दगडफेक झाली आणि कंपन्यांमध्ये घुसून आंदोलकांनी तोडफोडही केली. वोक्हार्डच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी गोंधळ घातला. मायलॉन, स्टरलाइट या कंपन्यांवर दगडफेकही झाली. काही कंपन्यांमध्ये रात्रपाळी केलेले कामगार या आंदोलनामुळे सकाळी घरी परतू शकले नव्हते.

एनआरबी चौकात सायंकाळीही गोंधळ सुरू होता. दोन-अडीच हजार आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रुधुराच्या नळकांडय़ाही फोडल्या. एक ट्रक, अग्निशमन दलाची गाडी तसेच पोलिसांच्या गाडीलाही आंदोलकांनी आग लावली. शहरात अन्यत्रही काही ठिकाणी किरकोळ दगडफेक करण्यात आली. सकाळी क्रांती चौकात आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.

नाशिकला आंदोलनातून वगळल्याची घोषणा आधी झाली होती. प्रत्यक्षात तिथेही हिंसक घटना घडल्या. आंदोलनस्थळी भाजपचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांना धक्काबुक्की करण्यात आली, तर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना जाब विचारला गेला. नेत्यांच्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या अनियंत्रित जमावाने नंतर शहरात फिरून दुकाने बंद पाडली. दगडफेकीच्या इतर घटनांमध्ये पाच बसगाडय़ांचे नुकसान झाले.

दोन गट?

या आंदोलनावरून मराठा समाजात दोन गट पडले होते. या गटातील अंतर्गत मतभेदांचे रूपांतर धक्काबुक्की, गोंधळात झाल्याचे सांगितले जाते. डोंगरे वसतीगृह मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू झाल्यावर काही युवकांनी रस्त्यावर उतरण्याचा अट्टाहास धरला. त्यास ज्येष्ठांनी विरोध केला. या कुरबुरी नंतर वाढत गेल्या. राजकीय नेत्यांना भाषणेही करू दिली गेली नाहीत. यावेळी युवकांच्या एका गटाकडून ज्येष्ठ नेत्यांविषयी जातीवाचक शब्दप्रयोग केला गेला. त्यास कोकाटे यांनी आक्षेप घेतला. यावेळी उभयतांमध्ये धक्काबुक्की झाल्याने आंदोलनस्थळी गोंधळ उडाला. रस्त्यावर उतरलेल्या जमावाला नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. काही ठिकाणी त्यांना बळाचा वापर करावा लागला.

आंदोलनात काही ठिकाणी समंजसपणाचेही तुरळक दर्शन घडले. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस शिपायांना आंदोलनकर्त्यांनी आपल्या पंक्तीत बसवून जेवायला वाढले. उस्मानाबादमध्ये कडकडीत बंद झाला, मात्र रक्तदान करून अनोखे आंदोलन केले गेले.

आयटी कंपनीबाहेर तोडफोड

एरंडवणे भागातील पर्सिस्टंट कंपनीच्या प्रवेशद्वाराची आंदोलकांनी तोडफोड केली. तसेच औंध भागातील सनगार्ड एफआयएस या कंपनीत शिरलेल्या आंदोलकांनी तेथे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

बसगाडय़ांवर दगडफेक

पीएमपीच्या शहर आणि उपनगरातील ६८६ गाडय़ा गुरुवारी मार्गावर धावत होत्या. सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास आंदोलनाची तीव्रता वाढली आणि शनिपार, बिबवेवाडी, मांजरी गाव, लक्ष्मी रस्ता, मार्केट यार्ड या परिसरात पीएमपी गाडय़ांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यात पीएमपीचे अंदाजे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले.

चौकाचौकांत तरुणाईचा ठिय्या, नाकाबंदी ; वाळुजमध्ये आंदोलनाला हिंसक वळण

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान सकाळपासूनच तरुणाई रस्त्यावर उतरलेली होती. विशेष म्हणजे तरुणींचाही लक्षणीय सहभाग होता. चौकाचौकांत ठिय्या मांडून ‘जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा-लाख मराठा’ यासह सरकारविरोधातही गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. क्रांतिदिनी होणारे आंदोलन अहिंसक मार्गाने होईल, असे बुधवारी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले होते. मात्र वाळुजमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतले. वाळुजमध्ये पोलिसांचे एक वाहन, अग्निशमन दलाची गाडी तर एक खासगी गाडी जाळण्यात आली. पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या. मोबाइलवर चित्रीकरण करणाऱ्या काहींना व दोन पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. औरंगाबाद शहरातही हर्सूल भागात एक वाहन जाळण्यात आले. औरंगाबादच्या ग्रामीण भागात मात्र शांततेने आंदोलन पार पडल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवरायांचे चित्र असलेले भगवे झेंडे लावलेल्या दुचाकीवरून तरुण-तरुणी बंद पाळण्यात येत आहे का हे पाहण्यासाठी फिरत होते. हर्सूल, टीव्ही सेंटर, सिडको, एमजीएम, सेव्हन हिलचा पूल, गजानन महाराज मंदिरचा परिसर, आकाशवाणीचा चौक, क्रांती चौक, पैठण गेट, गुलमंडी, मुख्य बसस्थानक, मिल कॉर्नर अशा प्रत्येक मुख्य चौकात तरुणाईने नाकाबंदी केली होती. रस्ते वाहने लावून अडवल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांची काहीशी पंचाईत झाली. मात्र अडचण सांगितल्यानंतर तेवढय़ाच संवेदनशीलतेने तरुणाईने काहींना रस्ताही मोकळा करून दिला. सेव्हन हिलच्या पुलाजवळून आकाशवाणीच्या दिशेने जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्यात आला. शिवाजीनगर भागातील रेल्वे गेटजवळ रेल्वे रोको करण्यात आले. या वेळी मोठय़ा संख्येने तरुण रेल्वे रोको आंदोलनात सहभागी झाले होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

अडीच हजार पोलिसांसह, शीघ्र कृती दल आणि राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा तनात करण्यात आल्या होत्या. वाळुजला हिंसक वळण लागल्यानंतर शहरातून अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली.

बसफेऱ्या रद्द

मुख्य बसस्थानकातून जाणाऱ्या औरंगाबाद आगाराच्या १६७ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या फेऱ्यांच्या माध्यमातून जवळपास ५७ हजार किलोमीटर प्रवास होतो. दिवसभरात मुख्य बसस्थानकातून ८५० बसची ये-जा होते. गुरुवारी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर एकही वाहन रवाना झाले नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. सिडको बसस्थानकातून होणाऱ्या जवळपास ५४४ फेऱ्याही रद्द करण्यात आल्या होत्या, असे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी घोलप यांनी सांगितले.

आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड तालुक्यात येत असलेल्या मुंडवाडी येथील रवींद्र साहेबराव जाधव या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तत्काळ हा प्रकार नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने रवींद्र याला औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, रवींद्रचे सिटीस्कॅन करून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तो तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली असल्याचे घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. सोनवणे यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यत कडकडीत बंद !
दोघांच्या आत्महत्या, तर एकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

बीड : मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला जिल्ह्यत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पेट्रोल पंप, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा पूर्णपणे बंद राहिल्याने अघोषित संचारबंदीचे चित्र होते. आंदोलकांनी जागोजागी चक्काजाम करुन वाहतूक रोखली. तर कुंबेफळ येथे रस्त्यावरच स्वयंपाक करुन जेवण दिले. रौळसगावला महामार्गावर भजन, कीर्तन तर परळीत बलगाडय़ा उभ्या करुन रस्ता रोखला. आडसमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून, तर वडवणीत मुंडण करुन शासनाचा निषेध केला. बंदच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यत प्रचंड पोलिस बंदोबस्त तनात करण्यात आल्याने जिल्ह्यला छावणीचे स्वरुप आले होते. बीड पर्यायी रस्त्यावर नारळाने भरलेली मालमोटार आंदोलकांनी पेटवून दिली.

परळी तहसीलसमोर तब्बल एकवीस दिवस आंदोलकांनी ठिय्या मांडून मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्यात पेटवले. या पाश्र्वभूमीवर गुरुवारच्या बंदमध्ये काय होणार, अशी भीती व्यक्त केली जात असल्याने प्रशासनाने केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दलासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त शहरांसह गावापर्यंत तनात केला होता. तर प्रशासनाने रात्रीच शाळा, महाविद्यालयांना अधिकृतपणे सुटी जाहीर केली. मराठा क्रांती आंदोलकांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन ठिय्या मांडला. वडवणीत बंद काळात आंदोलकांनी रस्त्यावरच सामूहिक मुंडण केले, तर अर्धनग्न होऊन टायर जाळल्याने वाहतूकही ठप्प झाली. अंबाजोगाईत आंदोलक जनावरांसह रस्त्यावर उतरले. तर केज तालुक्यातील आडस येथे मुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून आपला संताप व्यक्त केला. रौळसगाव येथे महामार्गावरच आंदोलकांनी ठिय्या मांडून भजन, कीर्तन करत दुपापर्यंत वाहतूक रोखली. तर माजलगावमध्ये दुचाकीवरुन फेरी काढून परभणी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला.

बीड जिल्ह्यत पुन्हा दोघांच्या आत्महत्या

गुरुवारी बंददरम्यान दोन युवकांनी आत्महत्या करुन जीवन संपवले तर एकाने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. बीड तालुक्यातील पाटेगाव  येथील दिगंबर माणिक कदम (३२) या तरुणाने गळफास घेतल्याचे उघड झाले. आरक्षणासाठी बलिदान देत असल्याची चिठ्ठी त्याच्या खिशात सापडली. तर कांबी मंजरा (ता.गेवराई) येथील एकनाथ सुखदेव पठणे (४५) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. नांदूर फाटा येथे आंदोलनादरम्यान बीड तालुक्यातील धावज्याची वाडी येथील पांडुरंग चोबे या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र उपस्थितांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

परभणीत रास्ता रोको दरम्यान भजनकीर्तन ; रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, चुडावा स्थानकावर दगडफेक

परभणी : कुठे झाडे भररस्त्यात टाकून केलेला रास्ता रोको, तर कुठे भजनकीर्तन, कुठे रस्त्यात पंगत तर कुठे गुराढोरांना रस्त्यातच चारा घालून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न अशा अनोख्या आंदोलनांनी आज जिल्हाभरात बंदला कडकडीत प्रतिसाद मिळाला. आजच्या बंदच्या पाश्र्वभूमीवर फारशी वाहने रस्त्यावर उतरलीच नाहीत, तर आगाराबाहेर बसही गेल्या नाहीत. आजच्या रास्तारोकोचा मोठा फटका रेल्वेला बसला. पूर्णा तालुक्यातील चुडावा रेल्वे स्थानकावर झालेली दगडफेक, काही प्रवासी गाडय़ा रद्द, तर काही आंदोलनाच्या धास्तीने औरंगाबाद स्थानकावरच थांबवल्या. हा प्रकार सोडला तर जिल्हाभरात सर्वत्र रास्ता रोको आणि बंद शांततेत पार पडला.

आज येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मराठा समाजाचे आंदोलक, तरुण-तरुणींसह मोठय़ा प्रमाणात महिला वर्ग जमला होता. या जमावाचे रुपांतर भजनकीर्तन अशा उपक्रमात झाले. बराचवेळ या ठिकाणी कीर्तन आणि भजन सुरू होते.  शहरात सर्व बाजारपेठ बंद होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता तर बसस्थानकावरही शांतता होती.

पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर, गौर, नावकी, हयातनगर फाटा, चुडावा, िपपळा भत्या, धानोराकाळे, लक्ष्मीनगर, झिरोफाटा, पूर्णा टी पाईट  या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पाथरीतही रास्ता रोको व बंद कडकडीत पार पडला. पालम येथे आंदोलनात भजनकीर्तन पार पडले. अमरावती-तिरुपती एक्स्प्रेसवर काही अज्ञात इसमांनी चुडावा येथे दगडफेक केली आहे.

बंदला सोनपेठ येथे मोठा प्रतिसाद मिळाला.  परळी- गंगाखेड रोड वरील उक्कडगाव मक्ता येथे ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, तालुक्यातील शेळगाव, सायखेडा रोड, दुधगाव आदी ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. परळी रोडवरील  िपपरी पाटी येथे  नामदेव महाराज फपाळ यांचे कीर्तन झाले. येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात घेण्यात आलेल्या बठकीत जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधला.

हिंगोलीत कडकडीत बंद ; वाहनांची जाळपोळ, रेल्वे रोको, आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांना जेवण

हिंगोली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदमध्ये हिंगोली जिल्ह्यत सेनगाव येथील दोन वाहनांची जाळपोळ करण्यात आली.  जिल्ह्यतील रस्त्या-रस्त्यावर आंदोलनकर्त्यांनी झाडे तोडून, टायर जाळून वाहतूक पूर्णत: बंद केली. पांगरा शिंदे रेल्वे स्टेशनवर आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रोको आंदोलन केले. एका बाजूला आंदोलनाला हिंसक वळण लागत असताना डोंगरकडा येथील आंदोलनकर्त्यांनी बंदोबस्तावर आलेल्या पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था केली.

जिल्ह्यतील डोंगरकडा, आखाडा बाळापूर, कळमनुरी, खानापूर चित्ता, सावरखेडा, औंढा नागनाथ, येहळेगाव सोळंके, बोरजा, लिंबाळा, कन्हेरगाव नाका, माळहिवरा, बळसोंड, पानकन्हेरगाव, सेनगाव, नर्सी नामदेव, खुडज, वसमत तालुक्यातील खांडेगाव, जवळा बाजार, आडगाव रंजे आदींसह प्रमुख रस्त्यावर ग्रामीण भागातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकत्रे जमले होते.

सेनगाव येथे एका शाळेचे वाहन बुधवारच्या मध्यरात्रीनंतर अज्ञातांनी पेटवून दिले. या जाळपोळीशी आंदोलनकर्त्यांचा संबंध नसल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले. याचप्रमाणे सेनगाव-रिसोड िहगोली येथील भूसंपादन विभागाची देखरेख करणारी भाडेतत्त्वावर घेतलेली जीप दुपारच्या वेळेत पेटवून दिली. िहगोली शहरातील गांधी चौकात आंदोलनकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता. शहरातून या जमावाने रॅली काढून राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली, तर अग्रसेन पुतळा येथे सुमारे २०० कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविला.

जालन्यात ठिय्या; चक्का जाम आंदोलन

जालना : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला जालना शहरासह जिल्ह्य़ात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. संपूर्ण जिल्हाभर रस्त्यांवर ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन झाले. त्यामुळे जिल्हाभरातील प्रमुख मार्गावरील दळणवळण दिवसभर बंदच होते. एस. टी. बस बंदच होत्या आणि खासगी वाहनेही रस्त्यावर आली नाहीत. त्यामुळे खासगी वाहनांतील प्रवासी वाहतूक बंद होती. शैक्षणिक संस्था बंदच होत्या. महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश असल्याने शहर आणि जिल्ह्य़ातील महाविद्यालये गुरुवारी बंदच होती. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या आदेशान्वये जालना शहर आणि जिल्ह्य़ातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद होत्या. जालनासह जिल्ह्य़ातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढय़ातही खरेदी-विक्री थांबले होते. मराठवाडा आणि राज्यात प्रमुख व्यापार केंद्र असलेल्या जालना शहरातील दुकाने बंद होती.

तालुक्यांच्या ठिकाणीही दुकाने उघडली नाही. जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. जालना शहरातील अंबड चौफुली भागातील रस्त्यावर महिलांनी ठिय्या आंदोलन केले. जालना शहरातील रिक्षाही जवळपास बंदच होत्या. रस्त्यांवर रहदारी तुरळक होती. बाहेरगावाहून येण्यासाठी वाहतुकीची साधनेच उपलब्ध नव्हती. जिल्ह्य़ात काही ठिकाणी रस्त्यावर पेटवलेले टायर टाकून वाहतूक अडविण्यात आली होती. जालना शहरासह परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद तालुक्यातही बंदला पूर्ण प्रतिसाद मिळाला.

उस्मानाबादमध्ये व्यवहार ठप्प ; २८६ आंदोलकांचे रक्तदान करून विधायक वळण

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन सुरू झालेल्या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनात उस्मानाबाद जिल्ह्यतून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यतील आठही तालुक्यांत औषध दुकाने आणि दवाखाने वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. राज्य सरकारच्या निषेधार्थ २८६ आंदोलनकर्त्यांनी रक्तदान करीत अभिनव पद्धतीने आंदोलन केले. दिवसभरात जिल्ह्यच्या रस्त्यांवरून एकही बस धावली नाही.

जिल्ह्यतील सर्वच तहसील कार्यालयांच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. उस्मानाबाद शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला अभिवादन करून शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.  त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी नऊ वाजल्यापासून ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला. या आंदोलनात मुस्लीम, धनगर, िलगायत, दलित बांधवांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असे आवाहन करत उस्मानाबाद जिल्ह्यतील तरुणांना हत्या नको, आत्महत्या नको, करूया रक्तदान, देऊया जीवनदान, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत आंदोलनकर्त्यां तरुणांनी रक्तदानाच्या माध्यमातून नवा संदेश दिला.

नांदेड जिल्ह्य़ात शुकशुकाट ; लोहा तहसील कार्यालयाची जाळपोळ

नांदेड : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनादरम्यान ‘नांदेड बंद’ला गुरुवारी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान शहर व जिल्ह्यत वेगवेगळ्या ठिकाणी जाळपोळ, दगडफेक यांसारख्या अप्रिय घटनांची नोंद झाली.

गजबजलेल्या रस्त्यावर गुरुवारी सकाळी लक्षणीय शुकशुकाट होता. चार वेगवेगळ्या दिशांनी नांदेड शहरात येणाऱ्या विविध रस्त्यांवर आंदोलकांनी सकाळी १० नंतर सायंकाळपर्यंत ठिय्या दिला. शिवाजी पुतळ्याजवळ आंदोलक मोठय़ा संख्येने जमले. तेथे आरक्षण व इतर मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी झाली. अर्धापूर तालुक्यात मौजे िपपळगाव येथे आंदोलकांनी एक ट्रक जाळला. देगलूर तालुक्यातील हणेगाव येथे पंचायत समितीच्या जीपवर दगडफेक करून काच फोडण्यात आली, तसेच देगलूर येथे मोटारसायकल रॅलीतील युवकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसवर दगडफेक केली. हदगाव येथेही एका जीपला आग लावण्याचा प्रयत्न झाला. हिमायतनगर येथे दुपारी चारच्या सुमारास नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस रोखून धरण्यात आली.

लोहा येथून मिळालेल्या माहितीनुसार आंदोलनाच्या आदल्या रात्रीच लोहा तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षाला अज्ञात समाजकंटकांनी आग लावल्यानंतर एकच खळबळ उडाली. महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली.  दुपारी चारनंतर नांदेडमध्ये दोन वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर दगडफेक करून काचा फोडण्याचा प्रकार घडला. नांदेडच्या सिडको-हडको भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी उमरी येथे आंदोलकांनी रेल्वे स्थानकावर धुडगूस घालत रेल्वेच्या मालमत्तेचे मोठय़ा  प्रमाणावर नुकसान केले. परळी-अकोला, अकोला-पूर्णा, परभणी-नांदेड या तीन पॅसेंजर गाडय़ा आंदोलनामुळे पूर्णत रद्द करण्यात आल्या.

लातूरमध्ये आ. भिसे यांच्या गाडीवर दगडफेक

लातूर : मराठा क्रांती मोर्चाच्या जनआंदोलनामुळे चौकाचौकात वाहतूक बंद करून तरुण रस्त्यावर ठिय्या आंदोलन करतानाचे चित्र सर्वत्र होते. क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीबरोबर अन्य २० मागण्यांसाठी जनांदोलन पुकारले होते. या आंदोलनादरम्यान वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार सकाळी ६ पासूनच बंद होते.

एसटी महामंडळाला बंदच्या काळात नुकसान होऊ नये यासाठी जिल्हय़ातील सर्व डेपोस्थानी बस ठेवण्यात आल्या होत्या. शाळा, महाविद्यालये, शिकवणीवर्ग सर्वत्र शुकशुकाट होता.

लातूर शहरात प्रवेश करणाऱ्या बार्शी रस्ता, अंबाजोगाई रस्ता, औसा रस्ता, नांदेड रस्ता या चार प्रमुख मार्गाबरोबरच बाभळगाव रस्ता, कळंब रस्ता अशा सर्वच मार्गावर टायरला आग लावून रस्ते अडवण्यात आले होते. शहरातील सर्वच चौकात वाहतूक बंद करण्यात आली होती. शेकडो टायर विविध रस्त्यांवर जाळण्यात आले.

आंदोलकांना टायरची कुमक पुरवण्यासाठी विविध वाहनांतून जुने टायर घेऊन चौकाचौकांत जाऊन टायर पेटते राहावेत अशी व्यवस्था करण्यात आली होती. आमदार अमित देशमुखांसह अनेक जण रस्त्यावर उतरून या आंदोलकांसमवेत सहभागी झाले होते. या आंदोलनात पंधरा, सोळा वर्षांच्या तरुणांपासून ७० वर्षांच्या वृद्धापर्यंतचा सहभाग होता. तसेच तरुणी, महिलाही रस्त्यावर उतरल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागातही दिसत होते.

बंदचा प्रभाव शहरातील विविध गल्लीबोळात जाणवत होता त्यामुळे चहाची टपरी, पानाचा ठेला किंवा एखादे छोटे हॉटेल देखील सुरू नव्हते. शहरात २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी राहतात. ज्यांचे जेवण मेसवर अवलंबून आहे अशा मुला-मुलींची मात्र मोठी गरसोय झाली. काही वाहनांवर किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले. मात्र, मोठी हिंसाचाराची घटना कुठेही घडली नाही.

ग्रामीण भागातील भाजी विक्रेत्यांनी विक्रीसाठी भाजीच आणली नव्हती. मात्र, चुकून भाजी, फुले, फळे ज्यांनी आणली, त्यांचे मोठे नुकसान झाले. विशेषत: फुले सुकून गेल्यामुळे छोटय़ा व्यापाऱ्यांना याचा फटका बसला.

दगडफेकीच्या किरकोळ घटना

आंदोलनादरम्यान दिवसभर दगडफेकीच्या किरकोळ घटना अनेक ठिकाणी घडल्या. लातूर शहर महानगरपालिकेच्या आवारात उभ्या असणाऱ्या वाहनांवर दगडफेक करण्यात आल्यामुळे तीन वाहनांच्या काचा फुटल्या. लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे यांच्या गाडीवर रेणापूरजवळील पिंपळफाटा येथे दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून आमदार भिसे यांना लातूरकडे सुखरूप पाठवले. पिंपळफाटा येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार भिसे लातूरहून निघाले होते. तेथे कार्यकर्त्यांचे दोन गट होते. एका गटाने त्यांना बोलावले होते तर दुसऱ्या गटाचा त्यांना कडाडून विरोध होता. यातच आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीवर प्रचंड प्रमाणात दगडफेक केली.

कोल्हापुरात बंदला प्रतिसाद

कोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर बंदला आज प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यच्या ग्रामीण भागातील व्यवहार पूर्णत: ठप्प होते. कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.

मराठा समाजास आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आज राज्यव्यापी बंदची  हाक देण्यात आली होती. गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यत तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडल्याने प्रशासनाने या बंदकडे गांभीर्यपूर्वक लक्ष पुरवले होते. आज सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार बंद होते. रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.

राज्य परिवहन मंडळाची वाहतूक बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. ग्रामीण भागातील दूध संकलन बंद ठेवण्यात आले. सुमारे १० लाख लीटर दुधाचे संकलन ठप्प राहिले. संपूर्ण जिल्ह्यत शांततेत बंद ठेवण्यात आला.

कोल्हापुरात ठिय्या आंदोलन सुरू असलेला दसरा चौक आजही आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिला. मराठा क्रांतीच्या आंदोलकांनी शहरात फेऱ्या काढल्या. श्रीमंत शाहू महाराज, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार आदींनी शांततेच्या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. आंदोलनात राजकीय वैर असले तरी खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील हे शेजारी बसले होते. राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील या आमदारांसह माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यासह अनेक प्रमुख रस्त्यावर उतरले होते.

सांगलीत ‘महाराष्ट्र बंद’ शांततेत

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सांगलीत प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यत ठिकठिकाणी आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर रस्त्यावर मध्यरात्रीपासून एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती. व्यापारी पेठा, बाजार समिती, औद्योगिक आस्थापने, शाळा, महाविद्यालये आज बंद होती. रस्त्यावर वाहतूक ठप्पच होती, मात्र काही ठिकाणी पेटते टायर रस्त्यावर टाकण्याचे प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला.

सांगली, मिरज, कुपवाड शहरासह सर्व तालुके, गावोगावांत चक्का जाम आंदोलन करण्यात आले.  जिल्ह्यतील एस. टी. वाहतूक आज बंद होती. जिल्ह्यतील मिरज-पंढरपूर रोड, सांगली-इस्लामपूर रोडवरील लक्ष्मी फाटा, पद्माळे फाटय़ासह माधवनगर, बुधगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केलेल्या बंदच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यतील दूध संकलन बंद ठेवण्यात आले. सकाळी दूध संकलन बंद असल्याने सुमारे ७ लाख लीटर दुधाचे संकलन ठप्प राहिले. अत्यावश्यक सेवांमध्ये रुग्णालये, औषधालये आणि इंधन पंप सुरू ठेवण्यात आले होते.

सांगलीतील आंदोलनामध्ये आ. विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जयश्री पाटील आदींसह महापालिकेचे आजी-माजी नगरसेवक सहभागी झाले होते.

तर कडेगाव तालुक्यातील वांगी येथील आंदोलनात आ. मोहनराव कदम रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.

सोलापुरात ‘चक्का जाम’, ठिय्या आंदोलन

सोलापूर : मराठा समाजास आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्य़ात ‘चक्का जाम’ आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान जिल्ह्य़ातील मराठा आंदोलकांच्या दोन्ही गटातर्फे आज ‘बंद’ला फाटा देण्यात आला होता, तरीही अनेक भागात बंद पाळण्यात आला. या आंदोलनामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी एसटी बसची सेवा दिवसभर बंद ठेवण्यात आली होती.

सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडाला काळी पट्टी लावून मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने जुना पुणे चौत्रा नाक्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ‘चक्का जाम’ आंदोलन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाने केलेल्या मूक ठिय्या आंदोलनात महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळीराम साठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आदींचा सहभाग होता. तर जुना पुणे चौत्रा नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाने ‘चक्का जाम’ करताना त्यात सहभागी झालेल्या महिलांनी भजने म्हटली.

साताऱ्यात बंदमुळे जनजीवन ठप्प

वाई : मराठा आरक्षणासाठी पाळण्यात आलेल्या बंदला सातारा जिल्ह्यत प्रतिसाद मिळाला. सातारा शहर तसेच तालुक्यांच्या ठिकाणी बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, एसटी वाहतूक बंद होती. दरम्यान, आंदोलकांनी आज जिल्हय़ात जागोजागी ठिय्या आंदोलन केले.

सातारा शहरात आज बाजारपेठ बंद होती. सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून एकही बस सोडण्यात आली नाही. वाई शहरात मोर्चाचे आयोजन केले होते. एमआयडीसीसह सर्व शहरात बंद पाळण्यात आला. शुकशुकाट होता. खंडाळा येथेही आंदोलकांनी मोर्चा काढला होता. लोणंदचा आठवडी बाजार आज बंद ठेवण्यात आला होता. वडूजमध्ये मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मायणीत पदयात्रा काढण्यात आली. मेढा कुडाळ येथे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

पाटण शहरात तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद कडकडीत बंद

पाटण तहसील कार्यालयात मराठय़ांनी ठिय्या आंदोलन केले. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोल नाक्यावर भजन आंदोलन. उंब्रजमध्ये बंद पाळण्यात आला.

कराडमध्ये बंद

कराड – मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला कराडमध्ये प्रतिसाद लाभला. बाजारपेठ, शैक्षणिक संस्था आज बंद होत्या. दरम्यान, महामार्गासह अन्य रस्त्यांवर ठिकठिकाणी आंदोलकांनी ठाण मांडल्याने वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. ओगलेवाडी येथे शेतकऱ्यांनी पशुधनासह रास्ता रोकोमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला. कराडच्या प्रीतिसंगमावर आंदोलकांनी मुंडण आंदोलन केले.

पश्चिम वऱ्हाडात कडकडीत बंद

अकोला : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला पश्चिम वऱ्हाडात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्हय़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध ठिकाणी रॅली, मोर्चे काढून बंदचे आवाहन करण्यात आले. अनेक मार्गावर टायर जाळून चक्काजाम करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. शाळा, महाविद्यालय, पेट्रोलपंप, एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. किरकोळ अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला.

बंदला अकोला जिल्हय़ात व्यापक प्रतिसाद मिळाला. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठय़ा संख्येने आंदोलक एकत्र आले होते. यावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. शहरात सकाळपासूनच कडकडीत बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता.  शहरातील पेट्रोलपंपही बंदमध्ये सहभागी झाले होते. एसटी महामंडळानेही बससेवा बंद ठेवली होती. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली. जिल्हय़ातही सर्वत्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्यांचे मुख्यालय असलेल्या शहरांसह गावांमध्येही बंद पाळण्यात आला. अकोला- मूर्तिजापूरसह इतरही अनेक मार्गावर टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली होती.

वाशीम जिल्ह्यतील वाशीम, रिसोड, मालेगाव येथे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. याला संपूर्ण व्यावसायिकांनी आपला पाठिंबा दर्शवत दुकाने बंद ठेवली. वाशीम नाका येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. अनेक युवकांनी मुंडण करून निषेध नोंदवला.

बुलढाणा जिल्हय़ातही बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. बुलढाणा, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, मेहकर, देऊळगाव राजा, चिखली, सिंदखेडराजा, लोणार आदींसह जिल्हय़ातील सर्वत्र बंद पाळण्यात आला. मेहकर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी मुंडण करून आंदोलनाला पाठिंबा दिला. मुंबई-नागपूर महामार्गावर मुंडण करून चक्काजाम करण्यात आला. खिरोडा येथील पूर्णा नदीवर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी काही युवकांनी टायर जाळून सरकारचा निषेध नोंदवला.

मुख्यमंत्र्यांच्या पुतळय़ाचा दहनविधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी बंद पुकारण्यात आला. या बंददरम्यान वाशीम जिल्हय़ाच्या रिसोड तालुक्यातील लोणी बु. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून दहनविधीही करण्यात आला. या अभिनव आंदोलनात सर्वधर्मीयांनी सहभाग नोंदवला.

वर्धेत उत्स्फूर्त बंद

प्रतिनिधी, वर्धा : सकल मराठा समाजाने आज पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला जिल्हय़ात शंभर टक्के प्रतिसाद लाभला. कुठेही अनुचित प्रकार न घडल्याने पोलीस प्रशासने सुटकेचा नि:श्वास टाकला. शाळा-महाविद्यालये पूर्वसूचनेमूळे बंद होती. बंदच्या पाश्र्वभूमीवर स्कूलबस चालक संघटनेने आपली वाहतूक बंद ठेवली होती. परिणामी, काही पालकांनी स्वत: मुलांना सोडले, पण वेळेवर बंदचा शुकशुकाट दिसल्याने पालकांना मन:स्ताप सहन करावा लागला. बसस्थानकावर पोहोचलेल्या प्रवाशांनाही मन:स्ताप झाला. दुपापर्यंत १०६ बसफेऱ्यांपैकी केवळ ४० फेऱ्या झाल्या. खासगी प्रवासी वाहतूकही ठप्प होती. मोर्चेकर्त्यांनी सकाळी ११ वाजता शिवाजी चौकात येण्याचे आवाहन केले होते. याठिकाणी काही नेत्यांनी आपल्या भाषणातून राज्य शासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.

यवतमाळात शंभर टक्के प्रतिसाद 

यवतमाळ : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आयोजित महाराष्ट्र बंदच्या आवाहनास यवतमाळ जिल्ह्य़ात श्ांभर टक्के प्रतिसाद मिळाला. येथील मराठा कुणबी ठोक क्रांती मोर्चाच्या वतीने शहरात मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महिला आणि युवक  मोठय़ा संख्येने भगवे ध्वज फडकवत सहभागी झाले होते. सर्व शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.बंद शंभर  टक्के यशस्वी झाल्याची माहिती मराठा कुणबी ठोक क्रांती मोर्चाचे नेते माजी खासदार राजाभाऊ ठाकरेसह आदींनी वार्ताहर परिषदेत दिली.

मराठा  आरक्षणाच्या मागणीसाठी महागाव तालुक्यातील करजखेड येथे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी    पैनगंगा नदीत अर्धनग्न होऊन दोन तास आंदोलन केले. कोणतीही अनूचित घटना घडू नये म्हणून या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महागाव तालुक्यात सवना ते कलगाव दरम्यान बाभळीचे झाड कोसळून रस्त्यावर आडवे झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. सवना गुंज मार्गे मोटारसायकलने वृत्तपत्रांची पार्सल पोहोचवण्यात आले.

वाहने अडवणाऱ्यांकडून जेवणाच्या पंगती

आंदोलनकांनी नागपूर- बोरी- तुळजापूर महामार्ग सकाळी सात वाजल्यापासून अडवला होता. यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली. मात्र, आंदोलक एवढय़ावर थांबले नाहीत, तर महामार्ग अडवल्यामुळे वाहनधारकांची, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून भोजनाची व्यवस्था केली. त्यामुळे विदर्भ-मराठवाडय़ाला जोडणाऱ्या या महामार्गावर जेवणाची पंगत पाहायला मिळाली. या ‘रास्ता रोको’मुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असला तरी आंदोलकांनीची जेवणाची व्यवस्था केल्यामुळे त्यांची चिंता दूर झाली, असे दृश्य येथे होते.

गोंदियात संमिश्र प्रतिसाद

गोंदिया : आज सकाळापासून शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा महाविद्यालये बंद होती. मात्र, दुपारनंतर हळूहळू शहरातील काही दुकाने सुरू करण्यात आली. भाजीबाजार तुरळक प्रमाणात सुरू होता. बंद शांततेत पार पडला. मात्र, वाहतूक सेवेवर कोणताही परिणाम जाणवला नाही. शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

बंद शांततेत पार पडावा, त्याला हिंसक वळण लागू देऊ  नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी रॅली काढून केले होते. शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती, तर गोंदिया आगारातील मानवविकासच्या २८ बसेस तर शिवशाहीच्या दोन बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. केवळ रुग्णालये, औषध दुकाने सुरू होती. गुरुवारी सकाळीच मराठा समाजाच्यावतीने शहरातून रॅली काढून शहरातील नेहरू चौकात घोषणाबाजी केली. दुपारी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सकल मराठा समाजाद्वारे देण्यात आले.

भंडारा बेदखल

दरम्यान, आज जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा येथे मात्र मराठा आरक्षणासंदर्भात बंदचा प्रभाव संपूर्ण भंडारा शहरात कुठेच दिसून आला नाही. संपूर्ण भंडारा शहर राजरोसपणे सुरू होते.

अमरावतीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती : सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्य़ात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर रहाटगाव नजीक काही काळ रास्ता रोको केले. येथील राजकमल चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. बंद दरम्यान शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. पेट्रोल पंपही बंद होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

बंदला अमरावती चेंबर ऑफ कॉमर्ससह सर्व व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता. शहरातील मुख्य बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. सकाळी १० वाजता राजकमल चौकात आंदोलनकर्ते एकत्र होण्यास सुरुवात झाली. चौकात दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक नेत्यांनी आपल्या भाषणात सरकारच्या दिरंगाईच्या धोरणाबद्दल रोष व्यक्त केला. शहरातील विविध भागात दुचाकींवरून फेरी काढून आंदोलकांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. जिल्ह्य़ातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. एस.टी. बसवाहतूक देखील दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. चौका-चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला  होता. पेट्रोलपंप बंद असल्याने अनेक वाहनचालकांना पेट्रोलपंपांवरून परत जावे लागले. जिल्ह्य़ातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी कडकडीत बंद होता.

हजारोंचे ठिय्या आंदोलन शांततेत, शहरात कडकडीत बंद

नगर : मराठा आरक्षण मागणीसाठी आज, गुरुवारी नगर शहरात मराठा क्रांती जनआंदोलनने पुकारलेल्या बंदला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. किरकोळ दगडफेकीच्या दोन व भंगारमधील कार पेटवण्याची एक घटना वगळता आंदोलन शांततेत झाले. हजारो कार्यकर्त्यांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत पुणे-औरंगाबाद रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर भगवे ध्वज घेत ठिय्या दिला. ठिय्या आंदोलन शांततेत झाले. ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने परिसर दुमदुमुन गेला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान, या मागणीसाठी उद्या, शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय व प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर साखळी पद्धतीने उपोषण सुरु केले जाणार असल्याचे व त्यानंतर सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरु करणार असल्याचे आंदोलकांच्या समन्वयकांनी जाहीर केले. बंदला केडगाव, सावेडी, बोल्हेगाव, नागापुर, भिंगार या उपनगरातुनही उस्त्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी प्रोफेसर कॉलनी चौकातील रिया कॅफे या दुकानाची दगडफेक करुन काच फोडण्यात आली, तर एमआयडीसीतील कारखाने बंद ठेवण्यासाठी काही कंपन्यांवर दगडफेक केली. मात्र यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांकडे कोणीही तक्रार केली नसल्याचे सांगण्यात आले. नेप्ती चौकात पेटवण्यात आलेल्या कारच्या घटनेचा व आंदोलकांचा काही संबंध नसल्याचे तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितले. वैयक्तिक वादातून ही घटना घडली. पेटवलेली कारही भंगारमधील होती. शहरातील सर्वच बाजारपेठा, बाजार समितीमधील व्यवहार, शाळा, महाविद्यालये बंद होते. प्रमुख रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. रिक्षा, एसटी बस, खासगी वाहतूकही बंद होती.

सकाळपासूनच शहराच्या विविध भागातून भगवे ध्वज घेतलेल्या रॅली बसस्थानक चौकात जमू लागल्या होत्या. अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करुन, सकाळी १० पासून तेथे ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले, दुपारी १२ पर्यंत मराठा समाज तेथे हजारोंच्या संख्येने जमा झाला होता. महिलांची संख्याही लक्षणीय होती. बाळासाहेब पवार, बाळासाहेब मिसाळ, निखिल वारे, अजय बारस्कर, डॉ. संजय कळमकर, शिवाजीराव आढाव, प्राचार्य खासेराव शितोळे आदी वक्तयांनी आरक्षणामागील भूमिका विशद केली. गोंधळी समाजाच्या वतीने जागरण गोंधळ घालण्यात आला. पोवाडे म्हणण्यात आले, कीर्तनही झाले. शहराकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यावर रास्ता रोको आंदोलने सुरु असल्याने प्रमुख मार्गावर एकही वाहन धावताना दिसत नव्हते. सायंकाळी ४ च्या सुमाराला आंदोलन मागे घेण्यात आले. ठिय्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

क्षणचित्रे

* मराठा समाजाच्या आंदोलनाला मुस्लीम संघटनांचा पाठिंबा, ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी पाणी व केळी वाटप, स्वच्छताही केली.

* महापौर सुरेखा कदम, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आ. संग्राम जगताप यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सभापती आंदोलकांसमवेत रस्त्यावर बसकण मारुन बसले होते.

* ठिय्या आंदोलनादरम्यान शिस्त पाळली जात होती. एक रुग्णवाहिकेलाही जमावाने मार्ग काढून दिला.

* मागील आंदोलनावेळी सकल मराठा समाजाचे फलक लावले गेले होते, परंतु आजच्या आंदोलनात मराठा क्रांती जनआंदोलनचे फलक लावले गेले होते.

* बाजार समितीत आजचे कांद्याचे लिलावही रद्द करण्यात आले.

* ठिय्या आंदोलन संपल्यानंतर परिसराची समन्वयकांनी स्वच्छता केली.

मराठा क्रांती जनआंदोलनच्या वतीने आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील बसस्थानक चौकात गुरुवारी हजारोंच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात आले.

नेवासे येथे चक्काजाम ; तरवडीत वाहनांची तोडफोड

श्रीरामपूर : मराठा  समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला नेवासे शहर व तालुक्यात  शंभर टक्के  प्रतिसाद मिळाला. आंदोलन सर्वत्र शांततेत झाले मात्र तरवडी येथे वाहनांची तोडफोड करण्यात आली. नेवासे येथील  खोलेश्वर गणेश मंदिर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

आंदोलनामुळे आज नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक बंद होती. आगारातून  एकही बस बाहेर पडली नाही. शाळा व महाविद्यालये बंद होती.  नेवासे येथे खोलेश्वर गणेश मंदिर चौकात झालेले चक्काजाम आंदोलन सुमारे दीड तास चालले. आंदोलनाचे नेतृत्व दीपक धनगे ,भाऊसाहेब वाघ यांनी केले.

आंदोलनाचे संयोजक संभाजी माळवदे  यांनी  राज्यातील सर्व मराठा आमदारांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी केली. आरक्षणाला मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला  नेवासाफाटा,भेंडा, कुकाणा, सोनई,घोडेगाव,चांदा,सलाबतपूर,प्रवरासंगमया ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुकाने -घोडेगाव रस्त्यावर देवगाव येथे झालेल्या आंदोलनात आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पाठिंबा दिला.  आज सोनई येथे मोटारसायकल रॅली काढून सोनई-राहुरी रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आज सकाळपासूनच गावातील सर्व दुकानदारांनी आपली दुकाने शंभर टक्के बंद ठेवली होती. आंदोलनात  संतोष निमसे सर,डॉ.ज्ञानेश्वर दरंदले,महेश दरंदले,अमोल चव्हाण,विकी लाटे,संदीप लांडे,संदीप दरंदले,कृ ष्णा दरंदले,अनिकेत दरंदले,प्रणव दरंदले,अविनाश दरंदले,गोरव गाडे,पवन दरंदले ,अनिकेत दरंदले सहभागी झाले होते.दरम्यान काल रात्री सोनई मधील शिवाजी चौकात मराठा समाजाने जागरण गोंधळ घालून सरकारचा निषेध केला.

सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

पारनेर : पारनेर शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून स्मशानभूमीत दहन केले. दरम्यान क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पारनेर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारनेर शहरासह टाकळीढोकेश्?वर, कान्हूरपठार, निघोज, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, जवळा, अळकुटी आदी प्रमुख गावांसह वाडय़ावस्त्यांवरही शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

तालुक्यातील सर्वच व्यवहार सकाळपासूनच बंद होते. पारनेर शहरात कार्यकर्त्यांनी सकाळी १० वाजता आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सुमारे दीड तास रास्ता रोको झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी अचानक सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा आणली. त्या वेळी पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. अतिशय गनिमी काव्याने या अंत्ययात्रेचे नियोजन करण्यात आल्याने पोलिसांना ती रोखता आली नाही.

आंदोलनस्थळापासून मुख्य बाजारपेठेतून ही प्रेतयात्रा अमरधाममध्ये नेण्यात येऊन दहन करण्यात आले. महिलांसह मराठा कार्यकर्त्यांबरोबरच विविधधर्मीय कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन सुरू  झाल्यानंतर आंदोलनात शहीद झालेले १८ समाजबांधव तसेच मेजर कौस्तुभ राणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बंदच्या पाश्?र्वभूमीवर एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बसस्थानकावर दिवसभर शुकशुकाट होता. सहकारी बँका, पतसंस्था, राष्ट्रीयीकृत बँका तसेच शासकीय कार्यालयेही दिवसभर बंद होती. शाळा महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली होती.

मोर्चाचे समन्वयक संजय वाघमारे, संजय देशमुख, शिवाजी औटी, नगराध्यक्षा वर्षां नगरे, डॉ. संदीप औटी, शंकर नगरे, डॉ. नरेंद्र  मुळे, संभाजी औटी, संभाजी मगर, जिजाऊ  ब्रिगेडच्या अध्यक्षा रोहिणी वाघमारे, उपाध्यक्षा अर्चना औटी, सचिव सुवर्णा गट, सोनाली औटी, कार्याध्यक्ष योगिता गट, डॉ. बाळासाहेब कावरे, धीरज महांडुळे, जया सपकाळ, रोहिणी सुरवसे आदींसह सर्वधर्मीय कार्यकर्ते या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर व सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

१८ ऑगस्टला दशक्रिया विधी!

सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर येत्या १८ ऑगस्ट रोजी सरकारचा दशक्रिया विधी करण्यात येणार असल्याचे क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. या वेळी मुंडण करून शासनाचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.

रस्त्यात पंगत मांडून आंदोलन

राहाता : तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांनी आज पिंपरी निर्मळ येथील चौकात आमटी,भात बनवून दुपारच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्यावर पंगत धरून जेवणाचा आस्वाद घेत अनोखे आंदोलन केले. कार्यकर्त्यांचे भाषणे सुरू असताना एका तरुणास भाषण करण्यास नकार दिल्याने त्याने दोन्ही हातावर धारदार वस्तूने वार केले. या तरुणाविरुद्ध लोणी पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या मराठा क्रांती जन आंदोलनाच्या चक्का जाम आंदोलनास राहाता तालुक्यात शंभर टक्के प्रततिसाद मिळाला. अहमदनगर-मनमाड महामार्गावर पिंपरी निर्मळ व निमगाव निघोज येथे बावळण रस्त्यावर आंदोलकांनी ठिय्या मारल्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प होती. त्यामुळे शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तांचे हाल झाले

राहाता, साकुरी, पिंपरी निर्मळ, कोल्हार, निमगाव निघोज, लोणी, पुणतांबा व वाकडी या प्रमुख ठिकाणी आंदोलकांनी आंदोलन करून निषेध व्यक्त केला. लोणी येथील चित्रालय चौकात आंदोलन करून चित्रालय चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक तर प्रिन्स चौकाचे धर्मवीर संभाजी महाराज चौक असे नामांतर करून शंभर टक्के बंद पाळला.

सकाळी ९ वाजता आंदोलनास सुरुवात झाली. शाळा, महाविद्यालये, बँका, एसटी बस वाहतूक आदी सर्व बंद असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प होती. पिंपरी निर्मळ व राहाता येथील किरकोळ प्रकार वगळा तालुक्यात आंदोलन एकदम शांततेत पार पडले. दुपारी ४ वाजता तहसीलदार माणिकराव आहेर यांनी पिंपरी निर्मळ येथे आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांनी दिलेल्या निवेदनाचा स्वीकार केला. यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

नगर-मनमाड महामार्ग बंद; महामार्गावर रास्ता रोको

श्रीरामपूर : मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला राहुरी शहर व तालुक्यात उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. नगर-मनमाड महामार्ग बंद पाडण्यात आला होता. महामार्गावर सहा ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. मुळा नदीच्या पुलावर जागरण गोंधळ घालण्यात आला. राहुरीचा आठवडे बाजार आज बंद होता.

आज सकाळी राहुरी फॅक्टरी ते राहुरी शहरापर्यंत दुचाकीवर तरुणांनी फेरी काढली. मुळा नदीच्या पुलाजवळ  खंडोबा मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात माजी खासदार प्रसाद तनपुरे, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, देवेंद्र लांबे, शिवाजी डौले, सत्यवान पवार आदी सहभागी झाले होते. या वेळी जागरण गोंधळ व सत्यनारायण घालण्यात आला. आंदोलन सुरू असताना रुग्णवाहिकांना रस्ता खुला  करून देण्यात आला.  आज प्रथमच नगर-मनमाड महामार्ग दिवसभर बंद होता. महामार्गावर कोल्हार, चिंचोली फाटा, गुहा, राहुरी फॅक्टरी,  मूळा धरण फाटा, वांबोरी फाटा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आज तालुक्यातील ९६ गावात बंद पाळण्यात आला. बंदला व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्थानी पाठिंबा दिला होता. आज शाळा,महाविद्यालये बंद होती. बससेवा बंद होती. खासगी वाहनेही बंद होती. टाकळीमिया, वांबोरी, देवळालीप्रवरा, ब्राह्मणी, बारागावनांदूर आदी मोठय़ा गावात बंद पाळण्यात आला. बंदला विविध समाजाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. बंद शांततेत पार पडला.

अकोल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोले : सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला अकोल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बस स्थानकाच्या समोर चार तास रास्ता रोको करण्यात आला. या वेळी विविध वक्त्यांनी राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले. रास्ता रोको सुरू असतानाच काही तरुण कार्यकर्त्यांनी तेथून जवळच रस्त्यावर टायर पेटवून दिल्यामुळे काही क्षण वातावरण तणावपूर्ण बनले होते.बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व्यावसायिकांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते. शाळा,महाविद्यलये आदी शैक्षणिक संस्था बंद होत्या. तालुक्यातील एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. खासगी वाहतूकही बंद होती. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील अन्य सर्व व्यवहार बंद होते.

सकाळी बस स्थानक परिसरात मराठा क्रांती मोर्चा तसेच भाजप वगळता अन्य पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले. तेथून घोषणा देत रॅली काढण्यात आली.

रत्नागिरीसह निम्म्या जिल्ह्यत ‘बंद’ प्रभावहीन ; खेड, चिपळूण, गुहागर, लांजा बंद

रत्नागिरी : कोपर्डीतील भगिनीला न्याय आणि   मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने गुरूवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, लांजा येथे १०० टक्के प्रतिसाद मिळाला तर उर्वरित ठिकाणी ठिय्या आंदोलन आणि मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.  जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडला. मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठा आणि व्यवहारांना फटका बसला.

रत्नागिरीमध्ये गेल्याच आठवड्यात, ३ ऑगस्ट रोजी बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे  रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ३ ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी तालुक्यात बाजारपेठा सुरू होत्या, तर चिपळूणसह खेड, गुहागर, दापोली, लांजा येथे १०० टक्के बंद पाळण्यात आला .

चिपळूण तालुक्यात गुरूवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा समितीने शहरात भव्य रॅली काढून प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सावर्डे, शिरगाव, मार्गताम्हाणे, पोफळी, अलोरे, खेर्डी आदी परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. खेडमध्ये  आंदोलकांनी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तब्बल ५ तास ठिय्या आंदोलन केले. त्यापूर्वी  महाड नाका येथील गोळीबार मदान येथून प्रारंभ करण्यात आलेला मोर्चा  खेड शहरातील शिवाजी चौक, बस स्थानक, गांधी चौक बाजारपेठ, तीन बत्ती नाका, पोलीस स्थानकमाग्रे नगर परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून प्रांत कार्यालयात पोचला. तेथे आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रांताधिकारी अविषकुमार सोनोने, तहसीलदार अमोल कदम यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.  गुहागर तालुक्यातील मराठा समाजाच्यावतीने शृंगारतळीपासून गुहागरपर्यत रॅली काढून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. गुहागर तालुक्यातही शृंगारतळीपासून गुहागपर्यंत रॅॅली काढण्यात आली.   राज्यव्यापी बंदच्या पाश्र्वभूमीवर लांजा तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या वतीने गुरूवारी लांजा शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळला. सकाळी शहरातून मोर्चा काढून आपल्या मागण्यांबाबत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. बंदमुळे लांजा शहरात गुरूवारी दिवसभर शुकशुकाट जाणवत होता.

दापोली तालुक्यात घडलेल्या दुर्देवी घटनेच्या पाश्र्वभूमीवर रास्ता रोको करू नये, असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार दापोली शहर व तालुक्यात शांततेत मात्र जोशपूर्ण वातावरणात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी दापोली तालुक्यातील मराठा सामाजातील ज्येष्ठ नेते, महिला, युवक, युवती आदी कार्यकत्रे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान एस टी महामंडळाने  खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या लांब पल्ल्याच्या मार्गावरील एसटी गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातूनही प्रवाशांची फारशी वर्दळ नसल्याने काही गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.

मराठा समाज मोर्चाचे जेलभरो आंदोलन

सावंतवाडी :  सकल मराठा समाज सावंतवाडीच्या वतीने पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चाने जेलभरो आंदोलन करण्यात आले .सुमारे एक हजार  लोकांच्या या मोर्चातील चारशे पन्नास आंदोलक  पोलिसांच्या कारवाईला सामोरे गेले.

यावेळी आरक्षणाच्या बाजूने जोरदार घोषणा देण्यात आल्या .या जेलभरो  आंदोलनाच्या दरम्यान सावंतवाडी  बाजारपेठ सुरळीत सुरू होती .मात्र एसटी महामंडळाच्या बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे जनतेचे प्रचंड हाल झाले. आंदोलन शांततेत करण्यात आले.

या आंदोलनात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले ,माजी आमदार शिवराम दळवी, समन्वयक  विक्रांत सावंत  ,शेतकरी नेते वसंत केसरकर, प्रकाश परब, विकास भाई सावंत ,नारायण राणे ,अशोक दळवी, रुपेश राऊळ ,मनोज नाईक, सीताराम गावडे , अ‍ॅड. संदीप िनबाळकर, अ‍ॅड. शामराव सावंत , अ‍ॅड.  नीता गावडे, अ‍ॅड.  नीता सावंत कविटकर , उत्कर्षां गावकर ,पुडंलीक दळवी ,सदा सावंत, बाळा गावडे ,सुरेश गावडे ,प्रणाली नाईक, शीला सावंत, संजय राऊळ, विनोद सावंत ,रवींद्र म्हापसेकर, श्रीपाद सावंत ,संतोष जोईल, दिनेश सावंत , बाबल ठाकुर ,विकास सावंत ,प्रथमेश गावडे,  गौरेश सावंत, डीके सावंत ,अपर्णा कोठावळे ,सतीश बागवे,प्रशांत कोठावळे, सदा सावंत , अ‍ॅड. क्षितीज परब ,अमित मोय्रे अभय किनळोसकर, पंढरी राऊळ, जीवन लाड ,श्रीपाद सावंत, यांच्या सुमारे एक हजार मराठा बांधव उपस्थित होते . आरपीडी हायस्कूलच्या समोरील रस्त्यावर आंदोलक सकाळी जमा झाले यावेळी समन्वयक विक्रांत रावल यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पाश्र्वभूमी सांगता आंदोलन शांततेत करण्याचे आव्हान केले. या आरक्षणामुळे अन्य आरक्षणाला धोका होणार नाही याची खबरदारी सरकार घेईल असा विश्वास व्यक्त करून सर्व समाज बांधवांना  बरोबर घेऊन जाणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वाचा पािठबा  मिळाला त्याबद्दल धन्यवाद दिले .

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला पहिले आरक्षण दिले मराठा समाज सर्वाना बरोबर घेऊन जाणार आहे आज आम्ही राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून मराठा म्हणूनच या आंदोलनात सहभागी झालो आहोत असे ते म्हणाले .

माजी आमदार शिवराम दळवी म्हणाले राज्यभरात ५८ मोच्रे निघाले हे मोच्रे शांततेत झाली जगभर या मोर्चाचे कौतुक झाले .मात्र आरक्षण मिळाले नाही ,म्हणून मराठा बांधव राज्यभरात पुन्हा रस्त्यावर उतरला आहे आणि आंदोलन करत आहेत या मराठा समाज आरक्षणामुळे अन्य  समाजाचे आरक्षण हिरावून घेतले जाऊ नये अशी देखील समाजाने मागणी केलेली आहे त्यामुळे सरकारने जलदगतीने आरक्षणाची कृती करावी असे दळवी म्हणाले .

अ‍ॅड. संदीप निंबाळकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या   आरक्षणाची आठवण करून दिली तर सीताराम गावडे यांनी मराठा समाज कायमच सर्व समाजाला बरोबर घेऊन जात आहे पण हा समाज मागास राहिलेला आहे त्यामुळे कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावे हीच समाजाची मागणी आहे असे ते म्हणाले. अँड. नीता सावंत कविटकर यांनी देखील  उपस्थितांना मार्गदर्शन केले . शेतकरी संघटनेचे वसंत केसरकर यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मागणी करत आंदोलनाला पािठबा  दिला .यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडले यानंतर येथून आंदोलन पोलीस ठाण्याच्या दिशेने मोर्चाने निघाले.

श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या प्रतिमेस समन्वयक विक्रांत सावंत यांनी आंदोलकांच्या वतीने पुष्पांजली वाहिली आणि तेथे शहिद कौस्तुभ राणे ना  भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आणि आंदोलक पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना झाले.

सावंतवाडी पोलीस ठाण्यावर जेलभरो आंदोलन धडकले त्यावेळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे आंदोलकांना शांततेचे आवाहन करून तेथे जेलभरो आंदोलनात सहभागी दर्शवणाऱ्या आंदोलकांची नोंदणी करण्यात आली.

त्यानंतर पोलीस ठाण्यातील जागेच्या अभावामुळे रवींद्र मंगल कार्यालयात आणून  आंदोलकांना ठेवण्यात आले आणि दुपारनंतर  आंदोलकांना जाऊ देण्यात आले .सावंतवाडीतील आंदोलन शांततेत झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. एसटी बस बंद ठेवल्यामुळे ग्रामीण भागातील आंदोलक सावंतवाडीत पोहोचू शकले नसल्याचे विक्रांत सावंत यांनी सांगितले .अन्यथा आंदोलन मोठ्या संख्येने झाले असते असे देखील त्यांनी स्पष्ट केले .

मराठा आंदोलनाला रायगड जिल्ह्यत उत्तम प्रतिसाद

अलिबाग-  रायगड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला उत्तम प्रतिसाद लाभला. रोहा आणि मुरुड वगळता जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. वाहनांचे नुकसान होऊ नये म्हणून एसटीची वाहतुक बंद ठेवण्यात आली होती. महाड, पोलादपुर येथे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक आंदोलकांनी काही काळ रोखून धरली. तर जिल्हाधिकारी कार्यालयावर ठोक मोर्चा मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मुंबई पुणे दृतगती मार्गावरील वाहतुक सुरळीत सुरु होती. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरात हजारोच्या संख्येने मराठा बांधव एकवटले होते. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा समाजाचे अलिबाग तालुका अध्यक्ष नरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. अगदी लहान मुलेही या मोर्चात सहभागी झाली होती. जोगळेकर नाका येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हिराकोट तलाव येथे मोर्चा अडविण्यात आला. तेथून मोर्चाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकार्याच्या भेटीस गेले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी सादर केले. यावेळी नरेश सावंत यांच्यासह रघुजीराजे आंग्रे, उल्हास पवार, प्रविण कदम, संतोष पवार, प्रदिप ढवळे, ज्योती गावडे, विणा जाधव, किशोर अनुभवणे आदी उपस्थित होते.

पश्चिम विदर्भात कडकडीत, पूर्वमध्य भागात संमिश्र  प्रतिसाद

नागपूर  : सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला पश्चिम विदर्भात कडकडीत तर पूर्व विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान शाळा, महाविद्यालये, पेट्रोलपंप, एसटी बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. किरकोळ अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला. नागपूरमध्ये एका युवकाने रेल्वेपुढे झोकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ओढून घेतले.

अकोला जिल्हय़ात व्यापक प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेत शुकशुकाट होता. अकोला-मूर्तिजापूरसह इतरही अनेक मार्गावर चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. वाशीम जिल्ह्यत वाशीम, रिसोड, मालेगाव येथे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. वाशीम नाका येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्हय़ातही बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. मेहकर, मुंबई-नागपूर महामार्ग, खिरोडा येथील पूर्णा नदीवर रास्ता रोको करण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्य़ात बंद उत्स्फूर्त होता. अमरावती जिल्ह्य़ात रहाटगाव नजीक काही काळ रास्ता रोको आंदोलन झाले. येथील राजकमल चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. वर्धेतही बंद उस्फूर्त होता.

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

नागपूरमध्ये सकाळी महाआरती करण्यात आली. एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी रेल्वे रुळापुढे स्वत:ला झोकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ओढून घेतले.

भंडारा, गोंदियातही संमिश्र प्रतिसाद मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 4:02 am

Web Title: maratha quota stir maharashtra bandh get mixed response
Next Stories
1 गणेशोत्सव आवडत नसेल त्यांनी खुशाल स्मशानात जावे : उद्धव ठाकरे
2 वैद्यकीय प्रवेशोत्सुकांचे तपशील दलालांच्या हाती
3 ‘उसासाठी सूक्ष्मसिंचन न राबवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई’
Just Now!
X