क्रांती मोर्चातील समन्वयकांची माहिती

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी राज्यभर करण्यात येणारे आंदोलन हे शांतिपूर्ण, अहिंसक मार्गाने करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय क्षेत्र, शाळांच्या बस यांना आंदोलनातून वगण्यात आले आहे.

आरक्षणासाठीचे आंदोलन उद्यानंतरही पुढे सुरूच राहणार आहे. १० ऑगस्टपासून साखळी उपोषण तर १५ ऑगस्टपासून एक वेळ अन्नत्याग करीत चूल बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयकांच्या वतीने बुधवारी आयोजित पत्रकार बठकीत देण्यात आली. बंदच्या पाश्र्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्य़ातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी द्यावी, अशी सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी केली आहे. १० ऑगस्टपर्यंत मराठा समाजातील तरुणांवर आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर दाखल केलेले गुन्हे ‘सरसकट’ मागे घेण्यात यावेत. आतापर्यंत २८ जणांनी आरक्षणासाठी बलिदान दिलेले असून त्यांना प्रत्येकी ५० लाखांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच १० ते १२ ऑगस्ट या दरम्यान मराठवाडय़ात समुपदेशन यात्रा काढण्यात येणार असून मराठा समाजातील नराश्य आलेल्या तरुणांना आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यापासून परावृत्त करण्यासाठी ही यात्रा शुक्रवारी सकाळी क्रांती चौकापासून निघणार आहे.

शासनाने अजूनही मराठा आरक्षणाच्या मागणीला गंभीरतेने घेतलेले नाही. उच्च न्यायालयाने आंदोलन हिंसक होऊ देऊ नका आणि तरुणांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केल्यामुळे उद्याचा बंद हा शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले. दरम्यान, राज्यभरातील समन्वयकांची येथे एक बैठक घेण्यात आली. त्यात ९ ऑगस्टच्या व त्यानंतरच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आल्याचे समन्वयक विनोद पाटील यांनी सांगितले. या वेळी राजेंद्र दाते पाटील, अभिजित देशमुख, राजेंद्र काळे आदी या बठकीला उपस्थित होते.

उस्मानाबादेत धनगर आरक्षणासाठी आंदोलन

उस्मानाबाद-  धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी मेंढय़ा घेऊन धनगर समाजातील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक उत्तम जानकर, गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत धनगर समाजातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी मेंढय़ांना रस्त्यावर आणून उभे करण्यात आले होते. ३१ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या मोर्चापूर्वी सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. दुपारी पावणेबाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनाला सुरुवात झाली. दीड तास हे आंदोलन सुरू होते. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी आंदोलनकर्त्यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांना मागण्यांचे निवेदन दिले.