मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. शनिवारी नवी मुंबईतील तुर्भे येथे अरुण भडाळे (वय २६) या तरुणाने आत्महत्या केली. ‘राज्य शासन आरक्षण देत नाही, आता आम्ही काय करायचे’, असे त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

तुर्भे सेक्टर २० येथे राहणाऱ्या अरुण भडाळे या तरुणाने शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. अरुण हा दाना बाजार येथे माथाडी कामगार म्हणून काम करायचा. त्याने खासगी वित्तसंस्थेकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या वसुलीसाठी वित्तसंस्थेने त्याच्या मागे तगादा लावला होता. आत्महत्येपूर्वी अरुण भडाळेने सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. यात त्याने दोन जणांना आत्महत्येसाठी जबाबदारही ठरवले आहे. तसेच फडणवीस सरकार आरक्षण देत नाही, आम्ही काय करायचे, असेही त्याने चिठ्ठीत म्हटले आहे. शवविच्छेदन करु नये, असं त्याने चिठ्ठीत म्हटल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.