News Flash

Maratha Reservation: राज्याने धाडस करावं; केंद्राचं मी बघतो – उदयनराजे भोसले

मराठा आरक्षणासाठी राज्याने एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं; उदयनराजेंची मागणी

मराठा आरक्षणासाठी राज्याने एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं; उदयनराजेंची मागणी (एक्स्प्रेस फोटो - आशिष काळे)

मराठा आरक्षणासाठी राज्याने एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे यांनी केली आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यात पुण्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पुण्यात बैठक झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

“मराठा आऱक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. जर हे सगळे आमदार, खासदार एवढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील तर नेमकी समस्या काय आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार सोडून द्या सगळे…मी सगळ्यांबद्दलच विचारतोय. विशेष अधिवेशन बोलवा ना तुम्ही…लाईव्ह प्रक्षेपण करा. पण हे सभागृहात गेल्यावर एक बोलतात आणि बाहेर आल्यावर दुसरं बोलतात,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

…तर आमच्यावरही हल्ला करताना थांबणार नाहीत; संभाजीराजे भेटीनंतर उदयनराजेंचं वक्तव्य

केद्राच्या भूमिकेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “दम असेल तर अधिवेशन बोलवावं. आधीने राज्याने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावं नंतर मी केंद्राचं पाहतो,” असंही ते म्हणाले आहेत. “अधिवेशन बोलवून गायकवाड कमिशनच्या रिपोर्टवर चर्चा करावी. आता जस्टीस भोसले यांचा रिपोर्ट आला आहे. थप्पी गोळा करुन काय रद्दीत विकून त्यावर राज्य चालवणार का? काय फालतुगिरी सुरु आहे,” असा संताप व्यक्त करताना उदयनराजेंनी यांना आधी अधिवेशन घेऊ द्या, मग रुपरेषा ठरवतो. मग एकेकाला कसं गाठायचं ते मी बघतो असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

आमच्यावरही हल्ला होईल

“आपण जात कधी पाहिलेली नाही, पण आता तर लहानपणाचे मित्रदेखील अंतर ठेवून बोलतात. ही फळी कोण निर्माण करत आहे, तर ते राज्यकर्ते करत आहे. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. आरक्षण द्यायची इच्छाच नसून राजकारण करायचं आहे. व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. आम्ही आडवे आलो तर आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार आहे,” अशी भीती उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.

संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा

“मुद्द्यांवर आधारित राजकारण केलं तर लोक पाठिंबा देतील. मुद्दे घेतले जात नाहीत तर समाजाच्या आधारे राजकारण केलं जात आहे. कारण नसताना इतकी मोठी दुफळी निर्माण केली आहे. न्यायालयावर तर माझा विश्वासच नाही,” असं उदयनराजेंनी यावेळी सांगितलं. उदयनराजे यांनी यावेळी संभाजीराजेंनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्यांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा आहे, शेवटी मराठा आरक्षण हेच ध्येय आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.

“राज्यकर्त्यांना आतापर्यंत फार मुभा दिली आहे. निवडून आल्यानंतर लोकशाहीतील हे जे राजे आहेत त्यांनाही जाब विचारला पाहिजे. राजेशाही होती तेव्हा असं नव्हतं. लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर ते राजे नीट वागत नसले तर त्यांना आडवा आणि गाढलं पाहिजे असं ठाम मत आहे. त्यांना जाब विचारा आणि त्याची सुरुवात माझ्यापासून करा. प्रत्येक आमदार, खासदाराला विचारलं पाहिजे. किती दिवस लोकांना संभ्रमावस्थेत ठेवणार आहात आणि हा अधिकार कोणी दिला,” असा संतापही उदयनराजेंनी व्यक्त केला.

सुप्रीम कोर्टाने अहवाल वाचलाच नाही

भाजपा नेत्यांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता उदयनराजेंनी म्हटलं की, “पाच बोटं जशी सारखी नसतात तसं प्रत्येकाचं वेगळं मत असतं. माझी मूल्यं वेगळी आहे. मी जमिनीवर परिस्थिती पाहून चालणार माणूस आहे. कायदा वैगेरे मी मानत नाही”. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी गायकवाड कमिशनचा अहवालच वाचलेला नाही, हा माझा आरोप नाही तर ठाम मत आहे असंही म्हटलं.

“यामध्ये पक्ष आणू नका. मी जे बोलतोय ते सर्वांना लागू होतं. काँग्रेस, भाजपा, आरपीआय, जनता दल वैगेरे…मग सरकार किंवा लोकप्रतिनिधी कोणतेही असो. पण येथे समाजाचा प्रश्न आहे,” असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 2:52 pm

Web Title: maratha reservation chhatrapati udayanraje press conference chhatrapati sambhajiraje sgy 87
टॅग : Maratha Reservation
Next Stories
1 “सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपाला बिहार निवडणूक लढवायची होती”
2 …तर आमच्यावरही हल्ला करताना थांबणार नाहीत; संभाजीराजेंच्या भेटीनंतर उदयनराजेंचं वक्तव्य
3 Corona Vaccination : ‘या’ तारखेपर्यंत राज्यातील सर्वांचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य; अजित पवारांनी दिली माहिती
Just Now!
X