मराठा समाजाला आरक्षण हा सध्या महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा आहे. या मुद्द्यावर सरकार आणि विरोधक यांच्यात ‘तू तू – मैं मैं’ सुरु आहे. नुकतेच या आंदोलनात एका तरुणाने जलसमाधी घेतल्याने हा प्रश्न अधिक चिघळला असून मराठा समाजाकडून दोन दिवस विविध ठिकाणी बंद पाळण्यात आला. या बंद दरम्यान काही ठिकाणी आंदोलक हिंसक झाल्याचेही दिसले. त्यामुळे प्रत्येक नेत्याने आपल्या परीने मराठा समाजाला आरक्षण देणे, कसे गरजेचे आहे ते समजावून देण्यास सुरुवात केली. ‘मुख्यमंत्री पहाटे तीन–तीन वाजेपर्यंत जागून काम करतात’, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तर यापुढे एक पाऊल म्हणून राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तर ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते’, असे विधान केले. या दोन महत्वाच्या नेत्यांच्या विधानांचा आधार घेत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना उपरोधिक टोला लगावला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे की,

‘मुख्यमंत्री पहाटे तीन–तीन वाजेपर्यंत जागून काम करतात’, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगत असतात. ते खरे असेलही. कारण मराठा क्रांतीने झोप उडवल्यावर जागे राहावेच लागेल आणि पापणी मिटली तर पंकजा मुंडे आरक्षणाच्या फाईलवर सही करतील! म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी फाईल कोठे आहे हे शोधून आता तरी फायलीचा लाल दोरा सोडावा व मराठा समाजाची मागणी पुढे न्यावी!

पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे, नुसते सांगितले नाही तर शिवरायांची शपथ घेऊन सांगितले आहे की, ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते.’ याचा दुसरा अर्थ असा घेता येईल की, मराठा आरक्षणासंदर्भात फाईल मोकळी करायला सरकारात चालढकल केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय? असा प्रश्न पडतो. जे पंकजा मुंडे यांना जमू शकते ते फडणवीस यांना का जमू नये? असाही प्रश्न आंदोलकांना आता पडला असेल. मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात व असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर सौ. पंकजा यांना एक तासासाठी का होईना, पण सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे व तेवढी आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे. पंकजाताईंची भूमिका समजून घेतली पाहिजे.’

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विषयाने जोर धरला आहे. त्यामुळे आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.