सुपर न्यूमररी पद्धतीने मराठा समाजासाठी शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये जागा कशा वाढवता येतील याबाबत मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षण अभ्यासकांनी सविस्तर माहिती दिली. याबाबत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ पूर्ण सकारात्मक आहेत, अशी माहिती मराठा आरक्षणाचे अभ्यासक खासदार संभाजीराजे यांनी सांगितलं आहे, ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात आज सकल मराठा समाज आणि मंत्रिमंडळासोबत मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात आदी मंत्री उपस्थित होते.

खासदार संभाजीराजे म्हणाले, “आजच्या बैठकीत प्रामुख्याने दोन प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली. यामध्ये मराठा समाजाच्या सर्व अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना सुपर न्यूमररी पद्धतीने दुसऱ्यांच्या आरक्षणाच्या मूळ रचनेला धक्का न लावता आपण अधिक संख्येने जागा कशा देऊ शकतो, हे समजावून सांगितलं. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळ याबाबत पूर्ण सकारात्मक आहेत. याबाबत एसईबीसी आरक्षणाला पुन्हा धक्का लागणार नाही याचा आम्ही पुन्हा एकदा अभ्यास करतो, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.”

“मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाची युद्धपातळीवर बैठक होणार असून लवकरच ते याबाबत निर्णय कळवतील. उद्याच ते सर्व कायदा विभागाशी तसेच सुप्रीम कोर्टात राज्य शासनाच्यावतीने मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे अॅडव्होकेट जनरल मुकूल रोहतगी यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर ताबडतोब निर्णय कळवतील”

“नियुक्त्यांच्या विषयावरही याबैठकीत चर्चा झाली. २०१४ च्या एसईबीसी, २०१८च्या समांतर आरक्षणाच्या नियुक्त्यांबाबतीतही मुख्यमंत्री सकारात्मक होते. याबाबतही अभ्यास करुन लवकरच निर्णय देऊ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.” या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास असल्याचे यावेळी खासदार संभाजीराजे म्हणाले.