मराठा आरक्षणासाठी मुंबईत बैठकींचे सत्र सुरु असतानाच अमरावतीमध्ये एका मराठा आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. संजय महादेवराव कदम (४०, रा. वडाळी) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या मराठा आंदोलकाचे नाव आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघटनांच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. मराठवाड्यात आरक्षणाच्या मागणीवरुन आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या होत्या. आता अशीच घटना अमरावतीमध्ये घडली आहे. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास संजय कदम या मराठा आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. संजय यांनी हातात केरोसिनची बॉटल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. भोजनाची वेळ असल्याने सरकारी कार्यालयात फारशी वर्दळही नव्हती. याच सुमारास कदम यांनी त्यांच्या जवळील केरोसिन अंगावर ओतले. हा प्रकार पार्किंगची व्यवस्था सांभाळणारे कर्मचारी प्रमोद माहुरकर यांनी बघितला. त्यांनी तातडीने कदम यांच्या हातातील बॉटल हिसकावली आणि त्यांना रोखले. काही क्षणातच कार्यालयात तैनात असलेले पोलीसही तिथे पोहोचले. त्यांनी संजय कदम यांना ताब्यात घेतले आहे.