News Flash

…तर काय लायकी राहिली असती; निलेश राणेंचं अजित पवारांवर टीकास्त्र

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यावर निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यावर निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं...(संग्रहित छायाचित्र)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यापासून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाकडून झालेल्या टीकेला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उत्तर दिलं होतं. त्यावरून आता माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका करतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांना टोला लगावला होता. त्यानंतर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्याचबरोबर नरेंद्र पाटील यांच्यावरही टीका केली होती. अजित पवारांनी केलेल्या टीकेला माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात, त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत, त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका. पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा,” असा टोला निलेश राणे यांनी अजित पवारांना लगावला आहे.

हेही वाचा – “शरद पवारांच्या ड्रॉवरमधून चोरून ५४ आमदारांची यादी…”, चंद्रकांत पाटलांचं अजितदादांना प्रत्युत्तर

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

पुण्यात अजित पवार यांनी काल (६ जून) माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी पहाटेचा शपथविधी आणि मराठा आरक्षणावर भूमिका मांडली होती. “जी गोष्ट झाली आहे, तिला चौदा महिने झाले आहेत. मागच्या गोष्टी उकरून काढत आहेत. ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात. आता करोनाकडे लक्ष देणं आता महत्वाचे आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राज्यपाल यांना भेटलो, वरिष्ठांना देखील भेटणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे ग्राह्य धरलं, त्यानुसार साकल्याने विचार करू. सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले आणि सदस्यांची मतं घेत असून, आम्ही मार्ग काढत आहोत. मात्र काही जण काहीही स्टेटमेंट करत आहेत. टिकवता आलं नाही असं म्हणत आहेत. हेच मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं असतं, तर काय म्हटले असते. आम्हीच कायदा केला होता. आम्हीच असं केलं होतं तसं केलं होतं. असले धंदे आहेत याचा त्यामुळे मला राग येतो,” असं अजित पवार म्हणाले होते.

हेही वाचा- ते पुन्हा येतील हे सांगणारा मी पहिला माणूस होतो : संजय राऊत

नरेंद्र पाटलांवरही केली होती टीका…

नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारवर टीका केली होती. त्यालाही अजित पवार यांनी उत्तर दिलं होतं. “काही काहीजण भावनेच्या आहारी जाऊन काहीही बोलतात. कायदा, संविधान काहीही बघत नाहीत. म्हणून ती बातमी चालते. ही लोक काही काळ आमच्या बरोबर होती. त्यांचा आवाका किती आहे. हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे फार महत्त्व देत नाही,” असं अजित पवार म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 3:32 pm

Web Title: maratha reservation maharashtra politics ajit pawar nilesh rane sharad pawar bmh 90
Next Stories
1 लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या १०८ वर्षांच्या आजीचा जयंत पाटलांनी केला सत्कार
2 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधान मोदींची भेट; काय होणार चर्चा?
3 Maharashtra Unlock : एस.टी.चा पुन:श्च हरी ओम
Just Now!
X