News Flash

मराठा आरक्षण : मोदी सरकारने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला – सचिन सावंत

मोदी सरकारच्या महाराष्ट्रविरोधी भूमिकेवर जनतेने भाजपाला जाब विचारावा, असं देखील म्हणाले आहेत.

संग्रहीत

“मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवेळी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. १०२ व्या घटनादुरूस्तीनंतर फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात बेकायदेशीर आहे व राज्यांना आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकारच राहिला नाही, असे म्हणून मोदी सरकारने मराठा समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे” असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सांवत यांनी केला आहे.
तसेच, “अॅटर्नी जनरलच्या या भूमिकेतून मोदी सरकार हे आरक्षण विरोधी असून संविधानातील संघराज्य व्यवस्था त्यांना मान्य नसल्याचे स्पष्ट झाले,” अशी घणाघाती टीका देखील सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, “मराठा आरक्षण प्रश्नी भाजपाचा रागरंग अगोदरच दिसला होता ज्यावेळी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे राज्य सरकारच्या बैठकीला अनुपस्थित राहिले होते. अॅटर्नी जनरलनेही राज्याच्या वकीलांना भेट नाकारली होती. यातूनच राज्य सरकारला सहकार्य करायचे नाही हीच भूमिका भाजपाची होती. १०२ व्या घटना दुरूस्ती मागील मोदी सरकारचे अंतरंगही आता स्पष्ट झाले. सामाजिक आणि आर्थिक मागास जातींना संविधानातील तरतूदीनुसार न्याय देण्यासाठी मागासवर्गीय आयोग नेमून कायदा करण्याचा राज्यांचा अधिकारच केंद्र सरकारने काढून घेतला आहे हे स्पष्ट झाले आहे. राज्याराज्यांत वेगवेगळ्या जाती असून त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. संघराज्य व्यवस्थेत राज्यांतर्गत त्यांना न्याय देण्याचा अधिकार होता, पण आता ही संघराज्य व्यवस्था मोदी सरकारला मान्य नाही व सर्व अधिकार केंद्राने आपल्या ताब्यात घ्यायचा हा मानस आहे जो निषेधार्ह आहे. यातून भविष्यातील आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक छोट्या छोट्या समाजांना प्रचंड अडथळा निर्माण केला गेला आहे.”

केंद्र सरकारची आडमुठी भूमिका असल्याचा आरोप-
तसेच, “केंद्र सरकारची आडमुठी भूमिका असतानाही मविआ सरकारचे प्रयत्न मात्र यशस्वी झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी लढणाऱ्या सर्व राज्यांना नोटीस काढली असून, इंदिरा सहानी निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी मोठ्या घटनापीठाकडे सोपविण्याबाबत विचार केला जाईल.” असं देखील सावंत यांनी सांगितलं.

जनतेने जाब विचारला पाहिजे-
“मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे पण केंद्रातील भाजपा सरकार त्यात खोडा घालत आहे. मोदी सरकारच्या या महाराष्ट्र विरोधी भूमिकेवर राज्यातील भाजपा नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जनतेने जाब विचारला पाहिजे,” असेही सावंत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 5:24 pm

Web Title: maratha reservation modi government stabbed maharashtra in the back sachin sawant msr 87
Next Stories
1 …अन् जाता जाता उद्धव ठाकरेंनी लगावला फडणवीसांना टोला
2 Video: कोल्हापूरमध्ये दिसली मगर; नागरिकांची चिंता वाढली
3 Maharashtra Budget 2021 : हा अर्थसंकल्प म्हणजे जनतेची किमान समान फसवणूक कार्यक्रम – शेलार
Just Now!
X