मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देणार्‍या उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी युवा तालुकाध्यक्ष विशाल रोचकरी यांनी गुरूवारी जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षातच अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

तुळजापूर येथे मागील आठ दिवसांपूर्वी मराठा समाजातील काही युवक कार्यकर्ते उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांना भेटून विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेले होते. यावेळी गिरासे यांनी युवकांना कार्यालयात का आलात, अशी विचारणा करत अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकाराच्या निषेधार्थ एक दिवस तुळजापूरमध्ये बंद व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

गिरासे यांच्यावरील राग आणि मराठा आरक्षणाला होणारी दिरंगाई यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी युवा तालुकाध्यक्ष विशाल रोचकरी यांना राग अनावर झाला. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षातच गिरासे यांना निलंबित करा, अशी मागणी करत अंगावर डिझेल ओतून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी कक्षाबाहेर असलेल्या पोलीस कर्मचारी व अन्य कर्मचार्‍यांनी रोचकरी यांना रोखून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे हा अनर्थ टळला.