“मंत्रिमंडळात आणि बाहेर आम्ही कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. आघाडी सरकारच्यावेळी कायदा मांडण्यात आला आणि फडणवीस सरकारने कायदा केला, तेव्हा सुद्धा आम्ही पाठिंबा दिला” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ते पुण्यात समता भूमी येथे बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारमध्ये छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत. महात्मा फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून छगन भुजबळ आज पुण्यात आले आहेत. “ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका आहे. आमचा तसा प्रयत्न सुद्धा आहे” असे छगन भुजबळ म्हणाले.

“मराठा समाजातील काही नेते आता ओबीसीचं आरक्षण द्या. अशी मागणी करत आहेत. काही नेते कोर्टात गेले आहेत. ओबीसीमध्ये ४०० ते ४५० जाती आहेत. त्यांना बाहेर काढा. मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या आणि बाकीच्यांना बाहेर काढा अशी त्यांची मागणी आहे. ओबीसींना त्यांच्या सवलती घेता येणार नसतील, तर ओबीसी संघटनेचा नेता म्हणून त्यांना जागृत करणं आमचं काम आहे” असे छगन भुजबळ म्हणाले.

“विरोधकांचं काम विरोध करणं आहे. तेच आज ते करत आहेत. सरकारने जनतेसाठी खूप काम केले आहे” असा भुजबळ म्हणाले. “आता भारतरत्न दुर्देवाने वाटेल तशी वाटली जातात, महात्मा फुलेंना भारतरत्न मिळावा, अशी इच्छा आहे पण तो पुरस्कार मिळाला नाही, म्हणून त्यांचं मोठेपण कमी होत नाही” असे छगन भुजबळ म्हणाले.