पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी हतबल; शुल्कापोटी कर्जाचाही भार

मुंबई : अटीतटीच्या स्पर्धेतून प्रवेश मिळवून, प्रवेश घेण्यासाठी लाखो रुपयांची तरतूद झाल्यावर सुटकेचा नि:श्वास टाकून मिळालेल्या रुग्णालयात काम सुरू केल्यानंतर बाहेर पडण्याची वेळ आल्यामुळे आता पदव्युत्तर अभ्यासक्रम करणारे डॉक्टर पुरते हतबल झाले आहेत.

राज्यात पसंतीच्या विषयासाठी मराठा कोटय़ात प्रवेश मिळाल्यामुळे अनेक मराठा विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय कोटय़ात मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतले नाहीत. आता अखिल भारतीय कोटय़ाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यामुळे त्या माध्यमातून प्रवेश मिळण्याची संधी मावळली आहे. अभिमत विद्यापीठांमधील प्रवेश प्रक्रियाही पुढे सरकली आहे. आता राज्याच्या कोटय़ातून हव्या त्या विषयाच्या अभ्यासक्रमाला मिळालेला प्रवेशही गमवावा लागणार आहे. लाखो रुपयांच्या घरात पोहोचलेले महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे. खुल्या गटातील विद्यार्थीही हवालदिल आहेत. खुल्या गटासाठी राज्यात जागा कमी उपलब्ध झाल्यामुळे या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय कोटय़ातून मिळेल त्या महाविद्यालयांत प्रवेश घेतले होते.

पुन्हा न्यायालयाकडे दाद मागणार

‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिकेची मुभा आहे. त्यावर आम्ही विचार करीत आहोत. शासनाच्या हलगर्जीमुळे नुकसान होत आहे,’ असे मराठा कोटय़ातून प्रवेश मिळालेले डॉ. शिवाजी भोसले यांनी सांगितले.